राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन

  • आले रामराज्य अर्थात् राममंदिर ते राष्ट्रमंदिर’

  • रत्नागिरीत १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत कीर्तनसंध्या महोत्सव !

रत्नागिरी – येत्या २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. ५०० हून अधिक वर्षांच्या संघर्षानंतर श्रीराममंदिर उभे रहात आहे, या पार्श्वभूमीवर येथील कीर्तनसंध्या परिवाराने यंदाचा महोत्सव ‘आले रामराज्य अर्थात् राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ या विषयावर आयोजित केला आहे. १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत प्रतिदिन सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात हा महोत्सव होणार असून, त्याच्या सन्मानिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भारतीय बैठक सर्वांसाठी विनामूल्य आहे. या महोत्सवाचे यावर्षी तेरावे वर्ष आहे.


राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुश्राव्य आवाजात रामकथा, त्याच्या जोडीला अजरामर संगीत कलाकृती असलेल्या गीत-रामायणातील काही निवडक गाणी आणि शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.

रामकथा सांगत असतांना आफळेबुवा श्रीराममंदिराच्या उभारणीचा संक्षिप्त इतिहासही उलगडून सांगणार आहेत. तसेच ५०० हून अधिक वर्षांच्या संघर्षाचे फलित असलेल्या अयोध्येतील भव्य राममंदिराचा देखावा, हे यंदाच्या कीर्तनसंध्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

गीतरामायण कार्यक्रमात गायक अभिजित पंचभाई यांना सौ. दीप्ती कुलकर्णी (हार्माेनियम/सिंथेसायझर), प्रसाद करंबेळकर (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन), मनोज भांडवलकर (मृदुंग), तसेच तालवाद्य हरेश केळकर या कलाकारांची साथसंगत असेल.