Hezbollah:हिजबुल्लाचा नायनाट करण्याचाही इस्रायलचा निश्‍चय !

इस्रायल-हमास युद्ध

तेल अविव (इस्रायल) – ७ ऑक्टोबरला चालू झालेल्या इस्रायल-हमास युद्धाला ३ महिने पूर्ण झाले आहेत. ७ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायलमधील अनुमाने २४० लोकांचे अपहरण करून त्यांना गाझामध्ये ओलीस ठेवले होते. त्यांपैकी २५ ओलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. दुसरीकडे हमासने म्हटले आहे की, इस्रायलच्या बाँब आक्रमणांतच अनेक ओलीस ठार झाले.

इस्रायली संरक्षण दलाने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, लेबनॉनच्या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेलाही हमासप्रमाणे हाताळले जाईल. लेबनॉनमधून इस्रायलवरील आक्रमणे वाढलीच होती; पण त्यांमध्ये इराणमध्ये बनवलेली शस्त्रेही वापरली जात होती. इस्त्रायली सैन्याला एकाच वेळी दोन आघाड्यांवर गुंतवून ठेवण्याचा हिजबुल्लाचा प्रयत्न होता. यामुळे आता हिजबुल्लाचा नायनाट करण्याचा निश्‍चयही इस्रायलने केला आहे.

आकडेवारीच्या रूपात युद्धावर दृष्टीक्षेप !

१. इस्रायली सैन्याने हमासच्या तळांना सातत्याने केले लक्ष्य ! केवळ गेल्या २४ घंट्यांत हमासची १०० ठिकाणे उद्धवस्त !

२. गाझामध्ये रहाणार्‍या १९ लाख लोकांचे म्हणजे शहरातील ९० टक्के लोकांचे घरे सोडून पलायन !

३. इस्रायलने प्रथम उत्तर गाझामध्ये रहाणार्‍या लोकांना आक्रमणांपासून वाचण्यासाठी दक्षिण गाझामध्ये जाण्यास सांगितले आणि नंतर दक्षिण गाझामध्येही आक्रमणे केली.