‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज आहेत’, असा या महिलांचा भाव !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील नाझनीन अंसारी आणि नजमा परवीन या २ महिला अयोध्येत जाऊन राम ज्योती घेऊन येणार आहेत. या राम ज्योती त्या वाराणसीतील मुसलमान भागांत नेतील आणि तेथे ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज असून प्रत्येक भारतियाचा डी.एन्.ए. एकच आहे’ या संदेशाचा प्रसार करतील. अयोध्येमध्ये महंत शंभू देवाचार्य हे या दोघींना राम ज्योती देणार आहेत. यासह अयोध्येतील माती आणि शरयू नदीचे पवित्र जल हेही त्या घेऊन येणार आहेत. ‘भगवान श्रीराम आमचे पूर्वज आहेत’, असे त्यांचे म्हणणे आहे.
नाझनीन अंसारी यांनी श्रीरामचरितमानस आणि हनुमान चालिसा यांचे उर्दूमध्ये केले आहे भाषांतर !
बनारस हिंदु विश्वविद्यालयातून पदवी घेतलेल्या नाझनीन अंसारी यांनी श्रीरामचरितमानस आणि हनुमान चालिसा यांचे उर्दू भाषेमध्ये भाषांतर केले आहे. त्या शांती आणि एकता यांसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. वाराणसीतील पातालपुरी मटके महंत बालक दास त्यांचे गुरु आहेत. त्या ‘राम पथ’ नावाच्या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक कार्य करतात. नजमा यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयातून पीएच्.डी. केली आहे. गेल्या १७ वर्षांपासून त्या रामाची भक्ती करत आहेत.
व्यक्ती धर्मांतर करू शकते; मात्र पूर्वज नाही !
नाझनीन यांनी सांगितले की, अयोध्येत भगवान श्रीरामांचे मंदिर होत असल्याने आम्हाला आनंद होत आहे. भगवान श्रीराम आमचे पूर्वज आहेत. व्यक्ती धर्मांतर करू शकते; मात्र पूर्वज नाही. ज्या प्रकारे मुसलमानांसाठी मक्केचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे हिंदूंसाठी, जो भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी अयोध्येचे महत्त्व आहे.