Illegal Construction State Wide Agitations : सांकवाळ (गोवा) येथील वारसा स्थळावरील चर्च संस्थेने केलेले अतिक्रमण न हटवल्यास हिंदू राज्यव्यापी आंदोलन छेडणार !

हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांची पत्रकार परिषदेत चेतावणी

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) : शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (श्री विजयादुर्गादेवीचे मूळ स्थान) गेल्या १० वर्षांपासून चर्च संस्था शिस्तबद्धरित्या अतिक्रमण करत आहे. सरकारच्या सहकार्याने किंवा सरकारच्या निष्क्रीयतेमुळे चर्च संस्थेचे फावले आहे. पोर्तुगिजांनी पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर पाडले; परंतु त्यांना येथे चर्च उभारता आलेली नाही. पोर्तुगिजांचे हे अपुरे काम आता चर्च संस्था सरकारच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. सांकवाळ येथील वारसा स्थळावरील चर्च संस्थेचे अतिक्रमण सरकारने त्वरित हटवावे, अन्यथा समस्त हिंदू राज्यव्यापी आंदोलन छेडतील, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

श्री. चंद्रकांत (भाई ) पंडित,  सौ. शुभा सावंत,  प्रा. सुभाष वेलिंगकर,  श्री. संदीप पाळणी आणि  श्री. नितीन फळदेसाई

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री रामदास सावईवेरेकर, राष्ट्रीय बजरंग दलाचे नितीन फळदेसाई, ‘भारत माता की जय’चे अभय सामंत, हिंदु रक्षा महाआघाडीचे संदीप पाळणी, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत (भाई ) पंडित आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.

सांकवाळ येथील वारसा स्थळावरील चर्च संस्थेने केलेले अतिक्रमण

पत्रकार परिषदेत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी छायाचित्रे आदी पुराव्यांसह चर्च संस्थेने  ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी कशा प्रकारे अतिक्रमण केले आहे ? याचा पाढाच वाचला.

१. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वर्ष १९८३ मध्ये वारसा स्थळ म्हणून अधिसूचित झाले. वारसा स्थळी पुरातत्व खात्याच्या अनुमतीविना कोणतेच काम करता येत नाही. या ठिकाणी ७ ते १६ जानेवारी या कालावधीत फेस्त (जत्रा) आहे. यामुळे या ठिकाणी ‘क्रेन’च्या साहाय्याने लोखंडी पाईप भूमीत उभे केले आहेत. येथे कायमस्वरूपी मंडप बांधला जात आहे. सहस्रो खुर्च्या घातलेल्या आहेत.

२. वास्तविक १० वर्षांपूर्वी हेच फेस्त येथून ३ कि.मी. अंतरावर शिंदोळी या गावात भरत होते. शिंदोळी येथील ख्रिस्त्यांनी विरोध करूनही तेथील फेस्त ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी येथील भूमी बळकावण्यासाठी स्थलांतरित केले. शिंदोळी येथे फेस्त व्हावे, अशी मागणी करणार्‍या ख्रिस्त्यांना चर्च संस्थेने विविध कारणे पुढे करून धमकावले आणि चर्च संस्थेचा निर्णय मान्य करण्यास सांगितले.

३. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ (पदयात्रा) काढली जाते. विविध ठिकाणांहून येणार्‍या पदयात्रा ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे अस्त पावतात.

४. चर्चसंस्थेकडे या भूमीची मालकी हक्क दाखवणारी कोणतीच कागदपत्रे नाहीत. केवळ १/१४ उतारा आहे आणि हा उतारा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही.

५. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणचे तळे बुलडोझर घालून बुजवण्यात आले. तेथील पवित्र वडाचे झाड कापण्यात आले. देवळाचे अवशेष (पुरातत्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले) फोडून भूमीत पुरून भूमीसपाट करण्यात आले. या ठिकाणी ‘कपेल’ (छोटे चर्च) आणि सामान ठेवण्यासाठी खोली बांधण्यात आली. शिवलिंग ज्या ठिकाणी पुरले तेथे मोठा क्रॉस उभारण्यात आला आहे. या ठिकाणी वीज आणि पाणी यांची जोडणी देण्यात आली. तेथील भिंतीला ख्रिस्ती देवता फातिमा आदींच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

६. ‘वारसा स्थळाच्या ठिकाणी पूर्वी चर्च होते आणि मोठा आगीचा गोळा पडल्याने चर्च उद्ध्वस्त झाले’, असा खोटा इतिहास रचण्यात आला. हा इतिहास रचण्यात पुरातत्व खात्याची सक्रीय भूमिका आहे.

७. वारसा स्थळाचे नावही पालटण्याचा हा प्रयत्न आहे. चर्च संस्था या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ यांच्या नावाने या ठिकाणी मोठा प्रकल्प उभारू पहात आहे. या सर्व घटनांसंबंधी देवीच्या भक्तांनी वेळोवेळी पुरातत्व खाते आणि सरकार दरबारी तक्रार करूनही त्याला केराची टोपली दाखवण्यात आली.

हिंदु रक्षा महाआघाडीच्या मागण्या

१. सेंट जोसेफ वाझ फेस्त आणि ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ (पदयात्रा) यांना वारसा स्थळी घेण्यास बंदी घालावी.

२. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ चर्च’ असा फलक काढून त्या ठिकाणी पूर्वीचा ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हा फलक लावावा.

३. वेर्णा येथील पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या श्री महालसा मंदिराची हिंदूंनी पुनर्बांधणी केलेली आहे. याच धर्तीवर ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर उभारण्यास हिंदूंना अनुमती द्यावी.