उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
(‘वर्ष २०२० मध्ये कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के होती.’ – संकलक)
मार्गशीर्ष कृष्ण एकादशी (७.१.२०२४) या दिवशी कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याचा १० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि रामनाथी आश्रमातील साधक यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. अद्वैत रवींद्र पोत्रेकर याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. सोनाली पोत्रेकर आणि श्री. रवींद्र पोत्रेकर (कु. अद्वैतचे आई-वडील)
१ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘कु. अद्वैतची स्मरणशक्ती चांगली आहे. एकदा त्याला सांगितलेले तो जसेच्या तसे परत म्हणून दाखवतो. अद्वैतला शाळेतील विषयांत पूर्ण गुण मिळतात; पण त्याचा त्याला अहं नाही किंवा त्याला कौतुकाची अपेक्षाही नाही.
१ आ. समंजस : अद्वैत ‘एखादी वस्तू चांगली आहे का ?’, याचा विचार करून वस्तू मागतो. एखादी वस्तू किंवा खेळणे त्याला हवे असल्यास तो आधीच सांगतो; पण ती वस्तू किंवा खेळणे फार महाग असल्यास तो ‘मला नको’, असे सांगतो. अद्वैतला एखादी गोष्ट समजावून सांगितल्यास तो लगेचच ऐकतो.
१ इ. सात्त्विकतेची आवड : एखादी कृती करतांना तो ती सात्त्विक करण्याचा प्रयत्न करतो, उदा. एकदा त्याच्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा होती. तेव्हा त्याने शिकून घेऊन सात्त्विक रांगोळी काढली.
१ ई. प्रेमळ : त्याला शाळेत कुणी चॉकलेट दिले, तर तो ते घरी घेऊन येतो आणि त्याचा मोठा भाऊ सोहम्ला (आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १२ वर्षे) देऊन वाटून खातो.
१ उ. इतरांशी जवळीक करणे : अद्वैतची आश्रमातील सर्वांशी अल्प कालावधीत जवळीक झाली आहे.
१ ऊ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर अद्वैतमध्ये जाणवलेली साधनेची ओढ !
१. तो सलग १ – २ घंटे स्थिरतेने, एकाग्रतेने आणि भावपूर्ण नामजप करतो. तो नामजप करतांना वेगवेगळे भावप्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. तो भाव ठेवायला अल्प पडल्यास तो लगेच ती चूक फलकावर लिहितो.
२. तो नियमित, योग्य प्रकारे आणि मनाच्या स्तरावरील चूक फलकावर लिहितो. ‘अद्वैतने फलकावर लिहिलेली चूक वाचून अंतर्मुखता येते’, असे काही साधक मला सांगतात.
३. साधकांनी फलकांवर लिहिलेल्या चुका अभ्यासपूर्ण वाचून त्यातून तो शिकतो.
४. तो नियमितपणे फलकावर लिहिलेल्या सूचना वाचतो आणि त्या सूचनांचे पालन करतो.
५. तो स्वतःहून झाडांना पाणी घालण्याची सेवा एकाग्रतेने, आनंदाने आणि मनापासून करतो.
१ ए. बालसंतांप्रती भाव असणे
१. एकदा आश्रमात अद्वैत आणि सनातनचे पिहले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) खेळत होते. तेव्हा अद्वैत मला म्हणाला, ‘‘पू. भार्गवराम यांना बरे वाटावे, म्हणून मी हरल्याचा अभिनय करत होतो.’’
२. एकदा अद्वैत सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या समवेत खेळला. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘संपूर्ण ब्रह्मांडात पू. वामन यांचा आवाज गोड आणि मधुर आहे. ते अखंड नारायणांच्या अनुसंधानात असतात. ते गाडी खेळत असतांनाही त्यात नारायणांना घेऊन खेळतात.’’ (पू. वामन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘नारायण’ म्हणतात.)
१ ऐ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी कौतुक करणे : एकदा मी आणि अद्वैत रामनाथी आश्रमाच्या आगाशीत बसलो होतो. तेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि अद्वैत यांचे संभाषण झाले. ते मला म्हणाले, ‘‘अद्वैत जसेच्या तसे प्रसंग सांगतो. तो कलियुगातील नारदमुनी आहे. नारदमुनी देवतांचे जसे वार्ताहर आहेत, तसा अद्वैत आहे.’’
१ ओ. रामनाथी आश्रमात आल्यापासून अद्वैतमध्ये जाणवलेले पालट
अ. अद्वैतमध्ये स्थिरता वाढली असून आता तो प्रसंगांमध्ये अडकत नाही.
आ. अद्वैत नियमितपणे एका रुग्णाईत असलेल्या साधकाच्या खोलीतील परम पूज्यांच्या छायाचित्राला फूल किंवा तुळशीचे पान वहातो. ‘त्यांना बाहेर जाऊन फूल आणता येणार नाही’, हे स्वतःहून समजून घेऊन तो कृती करतो. इतरांचा विचार करण्याच्या समवेत ‘त्याच्यात भाव वाढला आहे’, असे आम्हाला वाटते.
इ. तो कुठेही, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी त्याचे अनुसंधान टिकून रहाते. वर्ष २०२३ मध्ये आम्ही दिवाळीत नांदेड आणि पुणे येथे गेलो होतो. तेव्हा तिथेही तो कुठले तरी स्तोत्र म्हणत असे किंवा नामजप करत असे.
१ औ. स्वभावदोष : सर्व कृती हळूहळू करणे, त्याला सांगूनही त्याच चुका पुन्हा करतो.’
२. सौ. सोनाली पोत्रेकर
२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन अभ्यासपूर्ण करणे : ‘अद्वैत प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतो. एकदा त्याला आलेल्या अनुभूती त्याने मला लिहून दिल्या. त्यात त्याने दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांप्रमाणे मथळा, क्रमांक, उपक्रमांक लिहिले होते. ते पाहून मला आश्चर्य वाटले. यावरून ‘तो दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन पुष्कळ अभ्यासपूर्ण आणि एकाग्रतेने करतो’, हे माझ्या लक्षात आले. तो मला अनेक वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतांना त्याला पडलेले प्रश्नही विचारतो.
२ आ. एक गमतीचा प्रश्न : एकदा त्याने मला विचारले, ‘‘आई, ‘अल्पशा’ हा गंभीर रोग आहे का ? ‘अल्पशा आजाराने निधन झाले’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अनेकदा लिहिलेले असते.’’
अद्वैतने लिहिलेल्या अनुभूती वाचून मला प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
३. श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘कु. अद्वैतच्या बोलण्यात गोडवा आणि निरागसता आहे.
आ. त्याला सांगितलेले नामजपादी उपाय तो ध्यानमंदिरात बसून गांभीर्याने पूर्ण करतो.
इ. एकदा तो घसरून पडल्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयातून आश्रमात परत आणल्यावर त्याला ‘वॉकर’च्या (चालायला साहाय्य करणारे साधन) साहाय्याने चालावे लागत होते. तरीही तो आनंदी होता.’
४. कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘कु. अद्वैत स्वतःहून माझ्या समवेत वाटिकेत फुलझाडांची सेवा करायला येतो.
आ. तो वाटिकेमध्ये आवडीने, मनापासून आणि शांतपणे सेवा करतो.
इ. तो पाणी वाया घालवत नाही.’
– (सर्व सूत्रांचा दिनांक ९.१२.२०२३)
|