रुग्‍णाईत असूनही सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणारे आणि सर्वांशी आदराने बोलणारे ढवळी, फोंडा, गोवा येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८४ वर्षे) !

श्री. अरविंद कुलकर्णी

१. बाबांची साधना अंतर्मनाने होत आहे, असे जाणवणे

‘माझे वडील श्री. अरविंद कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ८४ वर्षे) हे वर्ष २०२० पासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत. बाबा वर्ष २०२३ पासून आजारी असल्‍याने चालू शकत नाहीत. ‘बाबा कधीही नामजप करत आहेत किंवा देवाला प्रार्थना करत आहेत’, असे मला दिसले नाही; तरीही वर्ष २०२३ ते २०२४ या वर्षात बाबांची आध्‍यात्मिक पातळी १ टक्‍क्‍याने वाढून ६५ टक्‍के झाली. ‘त्‍यांची साधना नेमकी कशी चालू असेल ?’, याची मला जिज्ञासा होती. मला मागील वर्षभर त्‍यांची सेवा करण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी ‘ते माझ्‍यापेक्षा साधनेत पुढे कसे आहेत ? त्‍यांची साधना शीघ्र गतीने चालू आहे ? ‘त्‍यांची अंतर्मनाने साधना होत आहे’, म्‍हणजे काय ?’, याविषयी माझ्‍या अल्‍प बुद्धीला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

२. सतत कार्यरत असणे

‘बाबा रुग्‍णाईत होण्‍यापूर्वी नेहमी ५ वाजता उठायचे आणि रात्री ९ वाजता झोपायचे. ते दुपारी कधीही खोलीत जाऊन झोपत नसत. ते घरी आणि आश्रमात आल्‍यावरही सतत कार्यरत असायचे. बाबा कधीही दुसर्‍याकडून स्‍वतःची कामे करून घेत नसत. वयाच्‍या ८३ व्‍या वर्षापर्यंत त्‍यांचा दिनक्रम असाच होता.

३. रुग्‍णाईत असूनही परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे

कु. रूपाली कुलकर्णी

३ अ. प्रतिकूल परिस्‍थिती असूनही बाबांनी कधीही देवाला दोष न देणे : बाबा रुग्‍णाईत झाल्‍यावर त्‍यांची आधीची स्‍थिती पूर्ण पालटली. आता त्‍यांना चालता येत नसल्‍याने कुठेही जाता येत नाही आणि अधिक वेळ बसता येत नसल्‍याने झोपून रहावे लागते; मात्र त्‍यांनी या परिस्‍थितीत कधीही नशीब किंवा देव यांना दोष दिला नाही. ते कधीही चिडले किंवा निराश झाले नाहीत. याविषयी मी त्‍यांना विचारल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘देव जेव्‍हा पृथ्‍वीवर जन्‍म घेतो, तेव्‍हा देवालाही सर्व भोग भोगावे लागतात. आपण तर मनुष्‍य आहोत. आपण सर्व भोग भोगायलाच पाहिजेत.’’

३ आ. जीवनात आलेली सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारणे आणि ‘बाबांची अंतर्मनाची साधना आहे’, असे साधिकेला वाटणे : प.पू. डॉक्‍टर सांगतात, ‘नामजप, सत्‍संग आणि सत्‍सेवा यांपेक्षाही परिस्‍थिती स्‍वीकारणे ही सर्वोत्तम साधना आहे.’ माझ्‍या बाबांनी ‘त्‍यांच्‍या जीवनातआलेली सर्व परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारली असून अजूनही ते स्‍वीकारत आहेत आणि ही त्‍यांची अंतर्मनाची साधना आहे’, असे मला वाटते.

४. सर्वांना प्रेमाने जोडून ठेवणे

ते नेहमीच सर्वांना हात जोडून नमस्‍कार करतात. समोरील व्‍यक्‍तीने प्रतिसाद दिला किंवा नाही दिला, तरी त्‍यांना त्‍याविषयी काहीच वाटत नाही. एकदा २ – ३ साधक त्‍यांना प्रतिसाद न देता पुढे गेले, तरीही त्‍यानंतर समोर दिसणार्‍या साधकांना बाबा नमस्‍कार करतच होते. मी त्‍यांना विचारले, ‘‘एखाद्याने तुम्‍हाला प्रतिसाद दिला नाही, तर तुम्‍हाला काय वाटते ?’’ त्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘आपण त्‍याचा विचार करायचा नाही. ते घाईत असतील.’’ बाबांनी सर्वांनाच प्रेमाने जोडले आहे.

५. कुटुंबातील सर्वांशी आदराने बोलणे

बाबांना सर्वांबद्दल आदर आहे. बाबा मी, माझा मोठा भाऊ (राहुल) तसेच आई (सौ. सरस्‍वती कुलकर्णी, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७६ वर्षे ) यांच्‍याशी आदराने बोलतात. मी त्‍यांना म्‍हटले, ‘‘मी तुमची मुलगी आहे. माझ्‍याशी आदराने बोलू नका.’’ त्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘सगळ्‍यांनाच मान द्यायला हवा.’’

६. साधकांना साधनेचे योग्‍य दृष्‍टीकोन देणे

बाबांचेे साधनेचे दृष्‍टीकोनही स्‍पष्‍ट आहेत. एकदा एका साधिकेने बाबांना विचारले, ‘‘मी काय प्रयत्न करू ?’’ त्‍यावर बाबांनी उत्तर दिले, ‘‘आपण आपली सेवा एकदम चांगली करायची. आपली सेवा पाहिल्‍यावर कुणीही त्‍यात चूक दाखवायला नको. इतकी ती सेवा नीट व्‍हायला हवी.’’ एकदा एक साधक म्‍हणाला, ‘‘माझे साधनेचे प्रयत्न होत नाहीत.’’ त्‍यावर बाबांनी उत्तर दिले, ‘‘केल्‍याने होत आहे. आधी केलेच पाहिजे । तू प्रयत्न कर.’’

७. इतरांचा विचार करणे

मी बाबांची सेवा केल्‍यावर केवळ बसून राहिलेे, तर ते लगेच मला विचारतात, ‘‘सेवेला जायचे आहे ना ? आश्रमात आलो, तर सेवा करायला पाहिजे. सेवेला जा.’’ ते कधीच मला त्‍यांच्‍याजवळ अनावश्‍यक बसू देत नाहीत. त्‍यांचे आवरून झाल्‍यावर मला ते लगेच सेवेला जायला सांगतात.

८. ‘बाबांची सेवा ‘संतसेवा किंवा गुरुसेवा’ म्‍हणून करा’, असे परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे आणि बाबांच्‍या सहवासात ‘आध्‍यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवणे

बाबा आजारी पडल्‍यानंतर प.पू. डॉक्‍टरांनी आम्‍हाला निरोप पाठवला की, ‘बाबांची सेवा ‘संतसेवा किंवा गुरुसेवा’ म्‍हणून करा.’ तेव्‍हापासून आम्‍ही (मी आणि माझा भाऊ राहुल) बाबांची सेवा मनापासून करू लागलो. त्‍यांची सेवा करायला आरंभ केल्‍यापासून ‘आम्‍हाला आध्‍यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवते. ‘आम्‍ही केवळ त्‍यांची सेवा करायची आहे’, असा विचार न करता ‘बाबांकडून कसे शिकू शकतो ?’, असा प्रयत्न करतो. पूर्वी आमच्‍यात (मी आणि माझा भाऊ राहुल याच्‍यात) काही वेळा मतभेद होत असत. आता आम्‍ही दोघे एकमेकांना समजून घेतो. ‘आमच्‍या दोघांमध्‍ये असा पालट होईल’, असे मला कधीही वाटले नव्‍हते. हे केवळ प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे शक्‍य झाले आहे.

प.पू. डॉक्‍टर, प्रत्‍येक परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदी रहाणारे बाबा दिल्‍याबद्दल श्रीकृष्‍णाच्‍या आणि तुमच्‍या चरणी आम्‍ही कृतज्ञ आहोत. ‘तुम्‍ही आमच्‍याकडून बाबांची सेवा संतसेवा या भावाने करून घेत आहात’, त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते. ‘माझ्‍याकडून यापुढेही अशीच गुरुसेवा करून घ्‍यावी’, हीच आपल्‍या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. रूपाली कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), ढवळी, फोंडा, गोवा. (२४.१२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक