पू. शिवाजी वटकर यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जाणवलेले वैशिष्ट्य आणि त्यांच्या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीतील साम्य !

मार्गशीर्ष कृष्ण दशमी (६.१.२०२४) या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

‘साधकांकडून अनेक वेळा सद्गुरु किंवा सत्पुरुष यांनी सांगितलेले साधन, सेवा, वाचन, लेखन इत्यादी गोष्टी हे गुरु किंवा ईश्वर यांच्यावरील प्रेमापोटी न होता भयापोटी होते. अशी भीतीपोटी झालेली साधना बर्‍याच अंशी भगवंत प्राप्तीसाठी लाभदायक होत नाही. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांकडून अत्यंत प्रेमाने साधना करून घेतांनाच त्यांच्यातील ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धनही करून घेतले. याविषयीची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘प्रत्येक जीवात्मा हा ईश्वराचा अंश आहे’, या भावाने श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी कधीही कुणाचेही मन न दुखवणे

‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (श्री महाराज) म्हणायचे, ‘‘गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे,

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।। (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्लोक ७)

अर्थ : देहात असणारा सनातन जीवात्मा हा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मन अन् पाच इंद्रिये यांना आकर्षित करतो.

म्हणजे, प्रत्येक जीवात्मा हा ईश्वराचा अंश आहे; म्हणून ‘कुणाचेही मन कधीही दुखवू नये.’’ श्री महाराज यांनी स्वतः हे व्रत आजन्म सांभाळले आणि ‘तसे त्यांच्या शिष्यांनीही सांभाळावे’, अशी त्यांची इच्छा होती.

२. भक्तांना प्रेमाने त्यांच्या स्वभावदोषांची जाणीव करून देऊन स्वभावदोष घालवण्यासाठी साहाय्य करणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

‘श्री महाराज मायेत गटांगळ्या खाणार्‍या समाजातील लोकांना मायेतून बाहेर काढून त्यांना नामाने धुऊन पुसून स्वच्छ करायचे. ते त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांना त्यांचे स्वभावदोष अतिशय प्रेमाने आणि एखादे समर्पक उदाहरण देऊन लक्षात आणून द्यायचे. त्यामुळे श्री महाराज यांनी भक्ताला त्याचे स्वभावदोष चार-चौघांपुढे सांगितले, तरी त्याचे मन दुखावले जायचे नाही; उलट भक्त अंतर्मुख होऊन स्वतःचे स्वभावदोष घालवून स्वतःमध्ये सुधारणा करायचे. त्यामुळे भक्तांचे जन्मोजन्मींचे स्वभावदोषही दूर व्हायचे.

३. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी भक्तांच्या लक्षात आणून दिलेले स्वभावदोष

पू. शिवाजी वटकर

३ अ. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी ‘नकारात्मक निष्कर्ष काढणे’ आणि ‘मनाने ठरवणे’या स्वभावदोषांची भक्ताला करून दिलेली जाणीव ! : गोंदवले गावातील एक गरीब मुलगा २१ वर्षांचा झाला, तरी काही उद्योगधंदा किंवा नोकरी करत नव्हता. त्याचे अभ्यासातही लक्ष नव्हते. त्या मुलाच्या आईच्या विनंतीवरून श्री महाराज यांनी एका उच्चपदस्थ अधिकार्‍याला सांगून त्या मुलाला एका कारखान्यात नोकरी लावून दिली; पण काहीच दिवसांनी त्या मुलाने कुणालाही न सांगता नोकरी सोडली. त्यामुळे ते अधिकारी नाराज झाले आणि ‘यापुढे कुणालाही नोकरीला लावण्याच्या भानगडीत पडायचे नाही’, असे त्यांनी मनानेच ठरवले. तेव्हा श्री महाराज त्यांना समजावतांना म्हणाले, ‘‘समजा, ‘एका माळ्याने बरीच फुलझाडे लावली; पण त्यातील काही झाडे मेली, तर त्या माळ्याने विषण्ण होऊन ‘यापुढे मी झाडे लावणार नाही’, असे ठरवले, तर त्याचे असे करणे कितपत शहाणपणाचे होईल ? ‘फुलझाडे लावणे’, हे त्याचे काम असल्याने त्याने ते करायला हवे. ‘जी झाडे मरतील, त्याचे दुःख मानू नये आणि जी येतील, ती भगवंताच्या कृपेने आली’, असे समजावे.’ तसे ‘तुम्ही त्या मुलाला नोकरी लावून दिली’, यात तुमची काही चूक नाही. त्या मुलाचे प्रारब्ध किंवा अन्य काही कारणांनी त्याला नोकरी टिकवता आली नाही. याचा अर्थ ‘यापुढे कुणाला नोकरीला लावायचेच नाही’, असे मनाने ठरवून ‘नकारात्मक निष्कर्ष काढणे’, ही चूक आहे. ‘जे झाले, ते रामारायाच्या इच्छेने झाले’, असे साधकाने समजले पाहिजे.’’

३ आ. श्री महाराज यांनी भक्ताला त्याचे ‘स्वेच्छा’ आणि ‘आवड-नावड’ हे स्वभावदोष लक्षात आणून देणे : श्री महाराज यांच्याकडे येणारे एक भक्त एका अधिकोषात उच्च पदावर काम करत होते. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना दिलेले काम त्यांच्या मनाविरुद्ध होते. त्यामुळे ते भक्त निराश झाले होते. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, ‘‘समजा, ‘आपल्या घरी समारंभासाठी पुष्कळ लोक जेवायला येणार असतील, तर त्यासाठी आपण भाजी आणायला मंडईत जातो. पुष्कळ भाजी विकत घेऊन ती एखाद्या हेलकर्‍याच्या (हमालाच्या) साहाय्याने घरी आणतो आणि त्याला ठरवलेले पैसे देतो. तेव्हा हेलकरी ‘तुम्ही अमुक प्रकारची भाजी अधिक का घेतली किंवा का घेतली नाही ?’, असे गार्‍हाणे करील का ? आणि त्याने तसे केले, तर ते हास्यास्पद होणार नाही का ?’ त्याचप्रमाणे कार्यालयातील कामामुळे मन निराश होणे, हे हास्यास्पद आहे. मला अमकेच काम हवे, अमके नको’, असा आग्रह न धरता, ‘आपल्याला जे काम दिले जाईल, ते भगवंताच्या इच्छेने मिळाले आहे’, असे मानून ते उत्तम प्रकारे करणे’, हेच आपले कर्तव्य आहे. ‘प्रत्येकच कर्म रामाच्या इच्छेने माझ्या वाट्याला आले आहे. ते कर्म त्या क्षणाला मला आवडो किंवा न आवडो; पण ‘ते कर्म करणे’, यामध्ये अंतिमतः माझे हितच असणार आहे’, अशी निश्चिती निष्ठावान भक्ताला असायला हवी. अशाने त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आनंदाचा झाल्याविना रहाणार नाही.’’

३ इ. ‘भयापोटी साधना करू नये, ती भगवंतावरील प्रीतीने करावी !’ असे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी भक्तांना सांगणे : श्री महाराज यांचे एक भक्त विदेशात काही वर्षांसाठी जाणार होते. जाण्यापूर्वी ते श्री महाराज यांना भेटायला आले. तेव्हा श्री महाराज यांनी त्यांना दासबोधाची एक पोथी देऊन ती प्रतिदिन वाचण्यास सांगितली. पुढे ते भक्त काही वर्षांनी मायदेशी परतले. त्यानंतर श्री महाराज यांनी त्यांना दासबोधाच्या वाचनाविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘विदेशात असतांना मी काहीही झाले, तरी वाचन करायचे चुकवले नाही; परंतु इकडे आल्यावर गाठीभेटी आणि व्यवहार यांमुळे तितकेसे जमले नाही.’’ श्री महाराज म्हणाले, ‘‘हा भेद परिस्थितीतला नाही, तर मनःस्थितीमधला आहे. विदेशात असतांना ‘काही वावगे होऊ नये’, ही तुमची आंतरिक इच्छा होती; म्हणून तुम्ही वाचन चालू ठेवले. इकडे आल्यावर ते दडपण राहिले नाही. त्यामुळे हलगर्जीपणा झाला. तसे नसावे. धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा पठण (साधना) हे आपल्या कल्याणाचे म्हणून करावे, भयापोटी करू नये. असो, आतापर्यंत तुमचे जे वाचन झाले, ते भीतीने झाले; मात्र यापुढे ते (भगवंतावरील) प्रीतीने करावे.’’ यातून त्या भक्ताला त्याची चूक कळली.

४. सांप्रतकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन प्रक्रिया करून घेणे

सांप्रतकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून ‘गुरुकृपायोगा’नुसार ‘अष्टांग’ साधना (टीप) करून घेत आहेत. त्यामध्ये ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन प्रक्रियेला सर्वांत अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे सहस्रो साधकांचे स्वभावदोष न्यून होऊन त्यांचे गुणसंवर्धनही होत आहे. त्यामुळे त्यांची शीघ्र गतीने आध्यात्मिक प्रगती होत असून त्यांना जीवनात आनंद मिळत आहे.

(टीप – १. स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन २. अहं निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. भावजागृतीसाठी प्रयत्न, ७. सत्साठी त्याग, आणि ८. प्रीती (निरपेक्ष प्रेम))

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना अत्यंत प्रेमाने साधना सांगणे आणि केवळ त्यांच्या प्रीतीमुळेच साधक साधनारत रहाणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले माझ्याकडून मागील ३४ वर्षे ‘गुरुकृपायोगा’नुसार ‘अष्टांग’ साधना करून घेत आहेत. ते मला अत्यंत प्रेमाने साधना शिकवत आहेत. त्यांच्या मनात कुठलाही साधक किंवा जीवमात्र यांच्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया किंवा अपेक्षा नसते. त्यांनी आतापर्यंत कुणाचेही मन दुखावलेले मी पाहिले नाही. ‘कुणी कितीही अक्षम्य चुका केल्या किंवा अयोग्य वागले, तरी ते त्या साधकांशी प्रेमानेच वागतात’, हे मी आतापर्यंत अनुभवले आहे. त्यांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन प्रक्रिया केल्यामुळे माझ्याकडून होणार्‍या चुका आणि त्यामागील माझे स्वभावदोष माझ्या लक्षात येत आहेत. या प्रक्रियेच्या माध्यमातून ‘गुरुदेवच माझे स्वभावदोष आणि चुका आत्यंतिक प्रेमाने दाखवून देत आहेत’, असे मला वेळोवेळी वाटते. त्यामुळे माझ्यातील भीती आणि काळजी दूर होत आहे. मी त्यांनी सांगितलेली साधना भीतीपोटी किंवा ‘मला त्यांच्याकडून काही मिळावे’, यासाठी करत नसून त्यांच्या माझ्यावरील प्रीतीमुळेच सातत्याने, मनापासून, तळमळीने आणि उत्साहाने करत आहे. त्यामुळे मला आनंद मिळत असून त्यांच्याच कृपेने मला संतपदाचीही प्राप्ती झाली आहे.

‘आपल्या गुरूंनी सांगितलेली साधना अत्यंत प्रीतीने, उत्कटतेने आणि तळमळीने केली, तरच आपला परमार्थमार्ग सुगम, सुकर आणि आनंदाचा होईल’, असे मला वाटते. अत्यंत प्रेमाने साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवणारे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१२.२०२२)