श्रीरामाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे, हा मूर्खपणा !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे वक्तव्य

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

नवी देहली – श्रीरामाच्या नावावर राजकारण होणे योग्य नाही. राजकारण हे धर्माने केले पाहिजे. धर्माचे राजकारण करायला नको, असे वक्तव्य बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केले आहे. ते एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे अश्‍लाघ्य वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. या दृष्टीकोनातून पंडित शास्त्री यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

शास्त्री पुढे म्हणाले की, भारतातील नागरिकांमध्ये जागृती झाली आहे. आता त्यांनी मत त्यांच्या बुद्धीला अनुसरून दिले पाहिजे. ‘भारत विश्‍वगुरु झाला पाहिजे’, हा दृष्टीकोन असणारे सरकारच निवडले पाहिजे. श्रीराम म्हणजे मर्यादापुरुषोत्तम. श्रीराम म्हणजे संपन्नता, अखंडता आणि एकता आहे. श्रीरामाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे हा मूर्खपणा आहे.

सध्याचा काळ हा हिंदु धर्मासाठी सुवर्णकाळ !

या वेळी धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, ज्ञानवापीत शंकर आहेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. मथुरा ही श्रीकृष्णाचीच आहे. देशात न्यायालय आहे. भारतीय पुरातत्व विभागाला जे पुरावे मिळाले आहेत, त्यावरून हे सिद्ध होते की, तिथे सनातन धर्मच आहे. महंमद घोरी, अकबर, बाबर आदींनी मंदिरांवर जी आक्रमणे केली, ज्या जखमा केल्या, ते घाव आता भरले जात आहेत. सध्याचा काळ हिंदु धर्मासाठी आणि हिंदूंसाठी सुवर्णकाळ आहे.

संपादकीय भूमिका

  • जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत. हिंदू अशांची राजकीय कारकीर्द लोकशाहीने दिलेल्या शक्तीतून संपुष्टात आणतील, हे त्यांनी आता लक्षात ठेवले पाहिजे !