सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७९ वर्षे) यांनी सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या उलगडलेल्या हृद्य आठवणी !

आज, ६.१.२०२४ या दिवशी पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

‘२४.१२.२०२३ या दिवशी सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी देहत्याग केला. ६.१.२०२४ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७९ वर्षे) यांनी त्यांच्या संदर्भात सांगितलेल्या आठवणी येथे दिल्या आहेत.

पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी

‘माझी अत्यंत प्रिय असलेली आध्यात्मिक मैत्रीण पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला’, असे समजल्यावर माझ्या मनात त्यांच्या संदर्भातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. आमची ओळख वर्ष २०११ मध्ये झाली. माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर मी त्यांना माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा देत होते. त्यामुळे माझे त्यांच्याशी प्रती आठ दिवसांनी भ्रमणभाषवर बोलणे होत होते. त्यानंतर ‘आम्ही जिवलग मैत्रिणी कधी झालो ?’, ते मला समजलेच नाही.

(पू.) श्रीमती माया गोखले

१. प्रीती

अ. पू. काळेआजी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असत. माझा आढावा देऊन झाल्यावर त्या माझ्याकडे आमच्या घरातील सर्वांची विचारपूस करत आणि सर्वांना नमस्कार सांगत.

आ. वर्ष २०१८ मध्ये मी पुष्कळ रुग्णाईत झाल्याने रुग्णालयात होते. तेव्हा त्या मला प्रतिदिन भ्रमणभाष करून धीर देत असत. त्या मला ‘नामस्मरण होत आहे ना ?’, असे विचारत असत. त्यांच्या प्रेमळ बोलण्याने मी लवकर बरी झाले, हे मी कधीच विसरू शकत नाही.

इ. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्या मला भ्रमणभाष करून शुभेच्छा देत असत.

२. साधनेची तळमळ

त्या वृद्धत्वामुळे आणि रुग्णाईत असल्यामुळे घरी होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या गृहकृत्य साहाय्यक (घरात काम करायला येणार्‍या मावशी) यांना ‘कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप कसा करायचा’, हे सांगितले. त्यांनी त्यांच्या शेजारी रहात असलेल्या स्त्रियांना सनातन पंचांग वितरण केले. त्यांनी त्या स्त्रियांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून वर्गणीदार केले.

३. परिस्थितीशी आनंदाने जुळवून घेणे

त्यांना त्यांच्या मुलीसह (आधुनिक वैद्या ज्योती काळे यांच्यासह) नेपाळ येथे जावे लागले. तेथे पुष्कळ थंडी होती; मात्र त्यांनी त्याविषयी काही गार्‍हाणे न करता ते दिवस आनंदाने अनुभवले. त्यांनी घराच्या खिडकीतून दिसणार्‍या हिमालयाचे वर्णन इतके छान केले की, ‘ते दृश्य प्रत्यक्ष पहात आहोत’, असेच आम्हाला वाटले.

४. अहंशून्यता

अ. माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर देवाने आमची (सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९० वर्षे), पू. काळेआजी आणि मी) सलग ४ वर्षे प्रतिवर्षी समान आध्यात्मिक उन्नती करून घेतली; पण त्यानंतर मी मायेत अडकल्याने माझी २ वर्षे प्रगती झाली नाही. त्या दोघी संत झाल्या, तरीही आमच्या तिघींची मैत्री वाढतच होती. त्यांना ‘माझी लवकर प्रगती व्हावी’, असे वाटत असे.

आ. त्यानंतर उत्तरदायी साधकाने ‘पू. काळेआजींनी त्यांच्या साधनेचा आढावा पू. गोखलेआजींना (मला) द्यावा’, असे सांगितले. तेव्हा पू. काळेआजींनी मला याविषयी सहजतेने सांगितले. त्या माझ्यापेक्षा ज्ञानाने आणि वयाने मोठ्या होत्या. त्या माझ्यापेक्षा साधनेतही पुढे असल्यामुळे मला त्यांचा आढावा घेणे अवघड वाटले. मी तसे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी सहजतेने मला सांगितले, ‘‘तुम्ही संतत्वापर्यंत (तेव्हा पू. गोखलेआजींची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती.) आलाच आहात. आपण दोघींनी आज्ञापालन करूया.’’ त्यानंतर आम्ही दोघी एकमेकींना आठ दिवसांनी आढावा देत होतो. त्या रुग्णाईत झाल्यावर आम्ही एकमेकींना भ्रमणभाष करत होतो.

प्रेमळ आणि नेहमी आनंदी असणार्‍या पू. काळेआजी आता आपल्यात नाहीत; पण त्यांच्या संदर्भातील पुष्कळ आठवणी आहेत. पू. काळेआजींना वृद्धत्व आणि रुग्णाईत स्थिती यांमुळे भूलोकात गुरुकार्य करायला मर्यादा आल्या; मात्र देहत्यागानंतर त्या उच्च लोकात अन्य संतांच्या समवेत मोठे कार्य करतील आणि परात्पर गुरु डॉक्टर त्यांची पुढील आध्यात्मिक उन्नती करून घेतील.

‘आम्हाला त्यांच्यामधील गुण शिकता येऊ देत आणि त्यांच्यासारखे आनंदी रहाता येऊ दे’, अशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्याकडून पू. काळेआजींविषयी लिहून घेतले, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– (पू.) श्रीमती माया गोखले (सनातनच्या ८१ व्या व्यष्टी संत, वय ७९ वर्षे), लांजा, जि. रत्नागिरी. (२८.१२.२०२३)