Dabholkar Murder Case : सर्वोच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनाच्या विरोधातील याचिका फेटाळली !

मुक्ता दाभोलकर

नवी देहली – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित विक्रम भावे यांना मिळालेल्या जामिनाच्या विरोधात मुक्ता दाभोलकर यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका ५ जानेवारी या दिवशी न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी विक्रम भावे यांच्या वतीने बाजू मांडली.

ही याचिका फेटाळतांना न्यायमूर्ती एम्.एम्. सुंदरेश आणि एस्.व्ही.एन्. भाटी यांच्या खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’

विक्रम भावे यांच्यावर सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या आरोपींना साहाय्य केल्याचा आरोप आहे. आरोपी कळसकर यांनी दिलेल्या जबानीच्या आधारे सीबीआयने २५ मे २०१९ या दिवशी भावे यांना अटक केली होती. ६ मे २०२१ या दिवशी यांना जामीन मिळाला. मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता सुभाष झा यांनी भावे यांची बाजू मांडली होती. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे पुण्यातील खटल्याचे कामकाज पहात आहेत. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली होती.