Shriram Janmabhumi Verdict : श्रीरामजन्मभूमीचा निर्णय सर्व न्यायमूर्तींनी एकमताने दिला होता ! – सरन्यायाधीश चंद्रचूड

सरन्यायाधीश चंद्रचूड

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि विविध पैलू लक्षात घेऊन या खटल्याशी संबंधित सर्व न्यायमूर्तींनी एकमत घेऊन निर्णय दिला होता, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

सौजन्य न्यूज 18 युपी उत्तराखंड 

१. समलिंगी विवाहाला मान्यता नाकारण्याच्या संदर्भातील निर्णयावर सरन्यायधीश चंद्रचूड म्हणाले की, या निर्णयानंतर जे काही निकाल आले, त्याविषयी मला कोणताही पश्‍चात्ताप नाही. समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्यास नकार देणार्‍या निर्णयाच्या गुणवत्तेवर भाष्य करणार नाही. आम्ही राज्यघटना आणि कायदा यांनुसार निर्णय घेतो. टीकेला प्रत्युत्तर देणे किंवा माझ्या निर्णयाचा बचाव करणे मला योग्य वाटत नाही.

२. सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले की, आमचे प्रशिक्षण आम्हाला एक गोष्ट शिकवते की, एकदा तुम्ही एखाद्या खटल्याचा निकाल दिला की, तुम्हाला त्यापासून दूर रहावे लागते. न्यायाधीश म्हणून निर्णय आपल्यासाठी कधीही वैयक्तिक नसतात. न्यायाधिशाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःला कधीही कोणत्याही समस्येशी न जोडणे, हा आहे.