Karnataka Congress : (म्हणे) ‘सिद्धरामय्याच राम असल्याने त्यांना अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय आवश्यकता ? ’ – काँग्रेसचे नेते एच्. अंजनेय

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते एच्. अंजनेय यांचे श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित रहाण्याच्या संदर्भात हास्यास्पद विधान !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेसचे नेते एच्. अंजनेय

बेंगळुरू (कर्नाटक) – मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. त्यांना अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय आवश्यकता आहे ? अयोध्येत भाजपचे राम आहेत. सिद्धरामय्या यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते एच्. अंजनेय यांनी चित्रदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना व्यक्त केली. ‘सिद्धरामय्या यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला बोलावले नाही, हे चांगले झाले’, असेही ते या वेळी म्हणाले.

अंजनेय पुढे म्हणाले की,

१. भाजपकडून अयोध्येतील श्रीराममंदिराचे सूत्र जाणीवपूर्वक तापवले जात आहे. राम सर्वत्र आहे. राम आपल्या हृदयात आहे. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की, रामायणात अंजनेयाने काय केले होते. (रामायणातील अंजनेयाने काय केले आणि आताचे नावाचेच अंजनेय काय करत आहेत, हे हिंदूंना दिसत आहे ! – संपादक)

२. ‘धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा’, अशीच भाजपची नीती राहिली आहे. भाजपला असे वाटते की, जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने आक्रमण केले, तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. भाजपने हिंदु धर्म किंवा हिंदू यांना विकत घेतलेले नाही.

३. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी रहातात जी जागा रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या रहाण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे स्थानांतरित करायला  हवे. या घरांना श्रीराममंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील.  (कर्नाटकात आता काँग्रेससेच सरकार असल्याने त्यांनी हे पुण्य कार्य स्वतःच्या हातून करावे, असेच जनतेला वाटते ! – संपादक) रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका.

संपादकीय भूमिका

  • अयोध्येत साडेपाचशे वर्षांनंतर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहात असल्याचे पाहून मुसलमानप्रेमी काँग्रेसवाले आणि अन्य राजकारणी यांना हिंदुद्वेषाची मळमळ होऊ लागली आहे. त्यातूनच ते अशी विधाने करू लागले आहेत; मात्र अशांना हिंदूच निवडणुकीत धडा शिकवणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
  • काँग्रेसला निवडून देणार्‍या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्‍चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !