रत्नागिरी कोकण कृषी विद्यापिठाचे तिळावरील पहिलेच संशोधन तिळाचे (‘कारळा’चे) नवीन वाण केले विकसित !

रत्नागिरी – पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या, तरी त्यांचे उत्पादन हळू हळू न्यून झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिरगाव येथील कोकण कृषी विद्यापिठाच्या भात संशोधन केंद्राने तिळावर (‘कारळा’वर) संशोधन केले असून नवीन वाण विकसित केले आहे. कृषी विद्यापिठाचे तिळावरील हे पहिलेच संशोधन असून, हे वाण हेक्टरी ४५० ते ५०० किलो उत्पादन देणारे आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात भात आणि नाचणीचे दुय्यम पीक घेतले जाते. पडीक, वरकस, पाण्याचा निचरा होणार्‍या जागेत तिळाचे पीक उत्तम येते. जिल्ह्यात तीळ लागवडीचे क्षेत्र केवळ ०.२० हेक्टर इतकेच होते. वर्ष २०१४-१५ पासून कोकण कृषी विद्यापिठाच्या भात संशोधन केंद्रात यावर संशोधन चालू होते. नाशिक, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील तिळाच्या जाती एकत्र करून संशोधन करण्यात आले. हे संशोधन आता पूर्ण होऊन नवीन वाण विकसित करण्यास विद्यापिठाला यश मिळाले आहे.

मागील खरीप हंगामात शेतकर्‍यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या  या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्‍यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आंबा आणि काजू या बागायती भूमीमध्येही हे आंतरपीक म्हणून घेता येणार आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना पावसाळी तिळाच्या शेतीतून उत्पन्न मिळू शकणार आहे. काळ्या तिळामध्ये शरिरासाठी पोषक असणारे कॅल्शिअम, फायबर, लोह आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक आढळतात. आहारात काळ्या तिळाचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारते. केस आणि त्वचेलाही तीळ लाभदायक आहे. त्यामुळे आहारात तीळ, तिळाचे तेल याचाही वापर केला जातो. तिळात तेलाचे प्रमाण कितपत आहे ? यावर पिकाची गुणवत्ताही ठरते.