सातारा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे देहली येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे, महापुरुषांचा अवमान करणार्यांना कठोर शासन होण्यासाठी कडक कायदा करावा, मंत्रालयाच्या वतीने शिवस्वराज्य सर्किट विकसित करावे, या मागण्यांसह स्वार्थापोटी ऐतिहासिक घटना रंगवणार्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात यावा’, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
खासदार भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘देहली येथे छत्रपतींचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, असा समस्त शिवप्रेमींचा आग्रह आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून पुरातत्व विभागाच्या वतीने प्रसिद्ध झालेली आणि न झालेली कागदपत्रे, चित्रे, शस्त्रागाराची माहिती आदी विषयांवर नव्याने अभ्यास करून अधिकृत इतिहास सरकारने प्रसिद्ध करावा. देश-विदेशात याविषयी जी कागदपत्रे आढळून येतील, ती भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत.’’