‘श्री. नारायण रामू राऊत ३० वर्षांपासून वारकरी संप्रदायानुसार साधना करत आहेत. मागील २६ वर्षांपासून ते वर्षातून २ वेळा पंढरपूरच्या वारीला जातात. राऊतकाकांची दोन्ही मुले श्री. रमेश राऊत आणि चंद्रकांत राऊत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. श्री. रमेश हे २० वर्षांपासून सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवा करत आहेत, तसेच श्री. चंद्रकांत राऊत हे मागील ७ वर्षांपासून रामनाथी येथील सनातन आश्रमात पूर्णवेळ बांधकामाशी संबंधित सेवा करत आहेत. बेळगाव येथील साधिका सौ. तारा शेट्टी यांना राऊतकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. निरपेक्षता
‘श्री. नारायण राऊतकाका यांच्या वयाच्या १० व्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराचे दायित्व आल्याने त्यांनी शिक्षण सोडून इतरांच्या शेतात जाऊन काम केले आणि घरखर्च चालवण्यास साहाय्य केले, तसेच राऊतकाकांनी स्वतः परिश्रम घेऊन त्यांच्या पाचही भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. ती मोठी झाल्यावर काकांनी त्यांची लग्नेही करून दिली. त्याविषयी (म्हणजे मी एवढे तुमच्यासाठी केले) ते कुणाकडेही काही बोलत नाहीत, तसेच त्यांनी भावंडांकडूनही कधी काही अपेक्षा केली नाही.
२. प्रेमळ स्वभाव
अ. काकांचा स्वभाव प्रेमळ आहे. ते आजपर्यंत कधी कुणाशी मोठ्याने किंवा रागाने बोलले नाहीत. श्री. राऊतकाका यांचे एकत्र कुटुंब आहे. काकांनी कुटुंबातील सर्वांना प्रेमाने जोडून ठेवले आहे.
आ. श्री. राऊतकाका त्यांच्या शेतात काम करण्यासाठी येणार्या कामगारांकडूनही प्रेमाने काम करून घेतात. काका कामगारांना ‘काम कसे करायचे ?’, ते शिकवतात आणि त्यांना साहाय्यही करतात.
इ. सनातनच्या साधकांविषयीही काकांच्या मनात पुष्कळ प्रेम आहे.
३. स्वावलंबी
उतारवयातही काका शेतातील सर्व कामे करतात. तसेच स्वतःची सर्व कामेही स्वतःच करतात.
४. शांत आणि प्रसन्न
काका नेहमी शांत आणि अंतर्मुख असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटते.
५. देवाप्रती भाव
अ. राऊतकाका प्रतिदिन विठ्ठलाची तुळशीपत्र आणि फुले वाहून भावपूर्ण पूजा करतात. एखाद्या दिवशी घरी फुले नसतील, तर ते गावात जाऊन फुले घेऊन येतात.
आ. ‘साक्षात् देव समोर उभा आहे आणि देवापर्यंत नामजप पोचत आहे’, असा भाव ठेवून ते नामजप करतात. त्यामुळे त्यांना नामजपातून आनंद मिळतो.
इ. ‘काका सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटते.
६. संतांप्रती भाव
झाडावरून पडल्यामुळे राऊतकाका यांच्या पायाचे शस्त्रकर्म झाले आहे. या शस्त्रकर्मानंतर काकांना पाठीत वाकून बसावे लागते. त्यांना ताठ बसता येत नाही. तरीही पू. रमानंद गौडा (धर्मप्रचारक संत, कर्नाटक) यांच्या नंदीहळ्ळी येथील एका सत्संगाच्या वेळी श्री. राऊतकाका पुष्कळ वेळ एका ठिकाणी बसले होते. सत्संगानंतर काकांच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद दिसत होता.’
– सौ. तारा शेट्टी, बेळगाव, कर्नाटक. (१८.४.२०२२)