देवाने वैद्या (कु.) शर्वरी बाकरे यांना सूक्ष्मातून साधनेसंदर्भात केलेले मार्गदर्शन !

‘देवाच्या अनुसंधानात असतांना त्याने मला साधनेसाठी पूरक असे विचार आणि दृष्टीकोन सुचवले. त्यातून मला साधनेमध्ये पुष्कळ साहाय्य झाले. ‘हे देवाने माझ्यासाठी केलेले मार्गदर्शनच आहे’, असे मला वाटते. ‘याचा सर्वांना लाभ व्हावा’, यासाठी देवाने केलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे पुढे दिली आहेत. 

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे

१. फुलपाखरांप्रमाणे आनंदी होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे

‘११.११.२०२१ या दिवशी मी ईश्वराला पुढील प्रार्थना केली – ‘फुलपाखरे फुलांकडे आकर्षित होतात, तसेच माझे मनही देवाच्या चरणांशी एकरूप होण्यासाठी व्याकुळ होऊ दे. फुलपाखरे जशी आपल्याला आनंद देतात, तसाच मलाही समष्टीला आनंद देता येऊ दे.’ ‘देवा, मलाही तुझे आनंदी आणि बागडणारे फुलपाखरू बनव’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

२. तीव्र तळमळ

‘दगडात देवत्व आणणारे आणि मातीच्या गोळ्यालाही देवत्व प्राप्त करून देणारे परात्पर गुरु डॉक्टर मलाही घडवतीलच; परंतु मी त्या प्रक्रियेला सामोरे जाण्याची सिद्धता आणि घडण्याची तळमळ वाढवायला हवी.’

३. ‘साधनेसाठी आपला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे’, असे वाटणे

‘साधनेसाठी आपला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर रुग्णाईत असूनही आम्हा साधकांसाठी पुष्कळ परिश्रम घेतात’, याची जाणीव ठेवून आपण प्रामाणिकपणे साधना करायला हवी’, असा माझ्या मनात विचार आला.

४. परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी अखंड रहाणे म्हणजे ‘एकै साधे सब सधै’!

५. प्रत्येक विचार समष्टीसाठीच असायला हवा

१४.११.२०२१ या दिवशी माझ्या मनात ‘आता माझे असे काही राहिलेच नाही. जे काही आहे, ते गुरुदेवांचे आणि गुरुदेवांना अत्यंत प्रिय असलेल्या साधकांचे आहे. मीसुद्धा समष्टीची आहे, तर माझा प्रत्येक विचार समष्टीसाठीच असायला हवा. जे समष्टीचा विचार करतात, त्यांचा विचार देव करतो’, असा विचार आला.

६. ‘मी सर्वस्व अर्पण केले’, असे आपण म्हणतो; पण आपण आपल्या स्वभावदोषांना चिकटून रहातो, तर देव आपल्याला दर्शन कसे देईल ?’

७. आपल्या मनात स्वकौतुकाचा विचार येऊ नये; कारण देवाला ‘आपण पुढे जावे’, अशी तळमळ अधिक असते. त्यामुळे आपल्याला देवाप्रती अखंड कृतज्ञ रहायला हवे.

८. मायेत सुखाच्या समवेत दुःखही मिळते; परंतु साधनेत केवळ आनंदच मिळतो.’

९. ‘मला माझ्या सहसाधकाने समजून घ्यावे’, असा विचार माझ्या मनात येताच, ‘देवाने मला माझ्या स्वभावदोषांसह स्वीकारले आहे. मला देव मिळाला की, सर्व मिळेलच. मला केवळ ईश्वरप्राप्तीसाठी निरपेक्षपणे प्रयत्न करायचे आहेत’, याची मला जाणीव झाली.’

१०. ‘केवळ साधकच नाही, तर काही जीवही भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करत असणे

‘सकाळी ध्यानमंदिराची स्वच्छता करतांना बाहेर एका कोपर्‍यात कुणीतरी ओव्याचे रोपटे ठेवले होते. ते रोपटे परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीच्या दिशेने झुकले होते. हे दृश्य पाहून माझ्या मनात विचार आला, ‘केवळ साधकच परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनासाठी आतुर आहेत, असे नाही, तर काही जीवही भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करत असतात. ‘देवाची आपल्यावर किती प्रीती आहे ना ! मी या डोळ्यांनी श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिले आहे. त्यांच्याशी बोलले आहे’, हा विचार मनात येऊन मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

११. छायाचित्रही अशाश्वत असल्याने ‘संतांसमवेत केवळ छायाचित्र नको, तर अखंड त्यांच्या चरणांशीच रहावे’, असे वाटणे

‘माझ्या काही मैत्रिणींचे संतांच्या समवेतचे छायाचित्र पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझेही संतांच्या समवेत एखादे छायाचित्र असावे, म्हणजे माझ्याकडे ती एक आठवण राहील.’ काही वेळाने मनात विचार आला, ‘हे छायाचित्रही शाश्वत नाही. केवळ देव शाश्वत आहे. त्यामुळे मला संतांसमवेत केवळ छायाचित्र नको, तर मला अखंड त्यांच्या चरणांशीच रहायचे आहे. त्यासाठी मला प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने प्रयत्न करायचे आहेत.’

१२. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष आणि अहं विरहित शुद्ध अन् निर्मळ मन देवाला अर्पण करणे

‘या दिवशी माझ्या मनात आले, ‘मन म्हणजे काटेरी झाडावरील सुगंधी फूल आहे. या मनरूपी फुलाला देवाच्या चरणी अर्पण व्हायचे आहे. त्यासाठी त्यावरील काटे, स्वभावदोषांचे संस्कार आणि अहं दूर करून केवळ ते फूलच समर्पित व्हावे, यासाठी मला करायचे प्रयत्न करायचे आहेत. यालाच प्रक्रिया म्हणतात.’

१३. ‘कौतुकाला पात्र होण्यासाठी नाही, तर देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी मला प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत.’

१४. ‘देवा, मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर मला केवळ तुझ्या चरणांशीच रहायचे आहे. तूच मला सतत तुझ्या जवळ ठेव. मी भरकटते, तेव्हा तूच मला तुझ्या प्रेमात बांधून ठेव. मला केवळ आनंदी रहायचे आहे. तुझ्या चरणांशी रहायचे आहे आणि काही नको भगवंता !’ (यानंतर माझी भावजागृती झाली.)

या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. यासाठी मी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेव, ‘या क्षुद्र जिवावर आपली अखंड कृपादृष्टी राहू दे आणि मला आपल्या चरणांशी सतत शरणागतभावात रहाता येऊ दे ’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक