आता मुला-मुलींच्या नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लागणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

बारामती (जिल्हा पुणे) – राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथे महिला धोरण आणले आहे. त्या अंतर्गत आता मुला-मुलींच्या नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव अन् शेवटी आडनाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलतांना दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘आदिती तटकरे या महिला असल्याने त्यांनी अत्यंत बारकाईने हे धोरण आखत ते राज्य सरकारपुढे आणले आहे. त्यानुसार हा पालट केला आहे. अर्थमंत्री या नात्याने मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सवलत दिली आहे. पुरुषांच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास ६ टक्के, तर महिलांच्या नावे होणार असल्यास ५ टक्के कर द्यावा लागेल. ५० लाख रुपयांचे घर महिलेच्या नावे घेतले, तर त्या कुटुंबाचे ५० सहस्र रुपये कर रूपाने वाचतील.’’