श्रमदानातून रस्ता करणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन !
पुणे – आंधळगाव (ता. शिरुर) ते निर्वी या दोन्ही गावांचा १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्धा किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी श्रमदानातून सोडवला. काही ग्रामस्थांनी आमदार अशोक पवार यांना रस्त्याची दुरवस्था निदर्शनास आणून दिली. आमदार पवार आणि ग्रामस्थ यांच्या साहाय्याने ३ दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. (लोकप्रतिनिधींनी याविषयी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित आहे ! – संपादक)
आंधळगाव येथे गावालगतच पाझर तलाव आहे. १५ वर्षांपूर्वी पाझर तलावाचे काम करतांना आंधळगावाहून निर्वी गावाकडे जाणारा रस्ता खोदण्यात आला होता. तो रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यात आला नव्हता. त्यामुळे नागरिकांना खासगी जागेतून जावे लागत होते. शेतमालाची वाहतूक करतांना ग्रामस्थांना त्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता. (१५ वर्षांपासून केवळ अर्धा किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त रहातो, हे प्रशासन आणि आतापर्यंतचे लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद ! – संपादक)