पुणे येथे अवैधरित्या ठेवलेल्या १० सिलेंडरचा एकाच वेळी स्फोट ! : परिसरात आगीचे लोळ

पुणे – येथील विमाननगर येथे सिंबॉयसिस महाविद्यालयाजवळ रोहन मिथिला इमारतीलगत एका इमारतीचे बांधकाम चालू होते. या इमारतीत १०० सिलेंडर अवैधरित्या ठेवण्यात आले होते. (एवढ्या मोठ्या संख्येत सिलेंडर अवैधरित्या ठेवले असतांना त्याची कल्पना कुणालाच कशी आली नाही ? – संपादक) २७ डिसेंबरला दुपारी १२.३० वाजता या सिलेंडरमधून गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला आणि १० सिलेंडर एका मागून एक फुटले. या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. यानंतर मोठी आग लागली होती. या आगीमुळे आणखी सिलेंडरचा स्फोट होण्याची भीती होती.या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाचे तीन बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. त्यानंतर सिलेंडर बाहेर काढण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पोलीसही घटनास्थळी आले होते. ही आग कशी लागली ? एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिलेंडर का ठेवण्यात आले होते ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत. पिंपरी-चिंचवड येथे अवैधरित्या गॅस भरत असतांना मोठा स्फोट झाला होता. यात ४ ‘स्कूल बस’ जळून खाक झाल्या होत्या. यानंतर अवैधरित्या सिलेंडरमधील गॅस चोरीची घटना उघडकीस आली होती.