‘११.७.२०२२ या दिवशी गुरुमाऊलींचे स्मरण होऊन मला पुढील ओळी सुचल्या. त्या मी श्री गुरुचरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.
एकच वर द्यावा ।
गुरुदेवा, मज एकच वर द्यावा ।
ब्रह्मांडीचा प्रत्येक जीव ।
आपल्या चरणी स्थिर व्हावा ।। धृ. ।।
क्षणोक्षणी तुला अनुभवावे ।
कणाकणात तुझे रूप दिसावे ।।
अज्ञानाची फाडूनी लक्तरे ।
ज्ञानरूपी साज चढवावा ।। १ ।।
क्षणभंगूर असे आमुचे जीवन ।
करा कृपा हो तुम्ही नारायण ।।
कृपाकटाक्षे दिव्य आपुल्या ।
अशाश्वताचा लय व्हावा ।। २ ।।
धन्य बापुडे तुम्हा पाहिले ।
सुंदर रूप मनी ठसवले ।।
भाग्यवान अवघे आम्ही जीव ।
भाव हा अखंड टिकावा ।। ३ ।।
प.पू. गुरुदेवा, झालो आम्ही धन्य ।
जन्मोजन्मीचे फळां आले पुण्य ।।
प्रत्येक श्वासी होवोनी स्मरण ।
अंतरी भावगंध दरवळावा ।। ४ ।।
मुक्ती देण्या धावले करुणाघन ।
ध्रुवासम लाभले अढळ गुरुचरण ।।
या चरणांच्या ठायी विसावा ।
अंतिम श्वासा मिळावा ।। ५ ।।
– आधुनिक वैद्य (डॉ.) श्रीपाद पेठकर, करकंब, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (११.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |