१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘लोणी कढत असतांना त्याचा जसा ‘कडकड’, असा आवाज होतो किंवा घागर पूर्ण भरलेली नसली, तर जसा तिचा ‘खळखळ’, असा आवाज होतो, तसे जोपर्यंत अज्ञान असते, तोपर्यंत ऐकलेल्या आणि वाचलेल्या ज्ञानाच्या गोष्टींची बडबड चालू असते. तूप तयार झाल्यावर लोण्याचा आवाज जसा आपसूकच बंद पडतो किंवा भरलेली घागर जशी डचमळत नाही, त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर बोलण्याची ऊर्मी आपसूकच बंद पडते.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘साधकांस सूचना’, सुवचन क्र. १८)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन
२ अ. ज्ञानी लोक अधिक बोलणे आणि उपदेश करणे टाळतात ! : ‘प.पू. कलावतीआईंचे वरील वचन वाचल्यावर मला माझे दोन गुरु, एक डोंबिवलीचे अण्णा लिमये आणि दुसरे अंबरनाथचे नाना उपाध्ये यांची आठवण झाली. त्यांच्याकडे गेल्यावर ते कधीच अधिक बोलत नसत. ते कुणाला उपदेश करत नसत. आलेल्या माणसाचे ते शांतपणे ऐकून घेत असत. ते केवळ हसत असत किंवा त्यांच्या चेहर्यावर त्याची प्रतिक्रिया उमटत असे; कारण ते ज्ञानी होते. लोकांना त्यांच्याकडून उपदेशाची अपेक्षा असे; परंतु ते कुठलाही उपदेश करत नसत. अगदी बोललेच, तर ते कुठल्यातरी इतर विषयावर अगदी थोडे बोलत असत.
डोंबिवलीचे अण्णा लिमये हे माझ्याशी ‘संगीत’ या विषयावर बोलत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी होती आणि पोशाखही सामान्य माणसासारखाच होता. ते कुणालाच त्यांच्या पाया पडू देत नसत. ते तोंडाने सतत ‘श्रीराम’, असे म्हणत असत. ते कीर्तन-प्रवचनसुद्धा करत नसत.
२ आ. वाचनाने किंवा कीर्तन-प्रवचन ऐकल्याने झालेल्या ज्ञानाने माणसात अहंकार निर्माण होतो आणि तो अव्याहतपणे ते ज्ञान इतरांना सांगू लागतो ! : मराठीत म्हण आहे, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार !’ वाचनाने किंवा कीर्तन-प्रवचने सतत ऐकल्याने माणसाला ज्ञान होत जाते; परंतु आत्मबोध किंवा आत्म्याचे ज्ञान होण्यासाठी त्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. वाचनाने किंवा कीर्तन-प्रवचन ऐकल्याने जे ज्ञान होते, त्यामुळे माणसाला ‘मी खूप ज्ञानी झालो’, असे वाटते. कुणी भेटले की, तो त्यांना ऐकीव गोष्टी ऐकवू लागतो. त्याला या थोड्याशा ज्ञानाचा अहंकार होतो. ‘ज्ञान हे समुद्रासारखे विशाल आहे’, याचा त्याला गंध नसतो. त्याला ज्ञानाच्या खोलीचा अंदाज नसतो. ‘आपल्याला भरपूर ज्ञान झाले’, असा अहंकार त्याच्या मनात निर्माण होतो. काही लोक तर भगवी वस्त्रे नेसून लोकांसमोर व्याख्याने देण्यास आरंभ करतात. ‘ही व्याख्याने, कीर्तने किंवा प्रवचने करणे’, हे माणसाच्या स्मरणशक्तीवर अवलंबून असते. जेवढी स्मरणशक्ती चांगली, तेवढे माणसाच्या चांगले लक्षात रहाते आणि या ज्ञानाचे ओझे तो सहन करू शकत नाही. ‘लगेच ते सर्व कुणाला तरी सांगावे’, असे त्याला वाटू लागते. त्याला कुणीही दिसले की, तो अव्याहतपणे ते ज्ञान सांगू लागतो; परंतु लोकांना त्याचे हे ज्ञान म्हणजे केवळ एक बडबड वाटते.
२ इ. पूर्ण ज्ञान झाल्याविना कुणालाही उपदेश करू नये ! : माणसाला एकदा आत्मबोध झाला की, तो आत्मसंवाद आणि गुरूंनी दिलेले नामस्मरण यांमध्ये मग्न होतो. तो सुख-दुःखाच्या पलीकडे जातो. समर्थ रामदासस्वामी एका श्लोकात म्हणतात,
फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ।। – मनाचे श्लोक, श्लोक ११४
समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘फुकटची बडबड करून काही उपयोग होत नाही. तुमची बडबड काही अज्ञानी लोक ऐकतील आणि तुमचा कदाचित् मानसन्मानही करतील; परंतु त्यामुळे तुमच्या मनात अहंकार वाढत जातो आणि त्याचे रूपांतर हळूहळू अधोगतीत होत जाते; म्हणून पूर्ण ज्ञान झाल्याविना कुणाला शिकवू नये, कुणाला काही सांगू नये आणि कुणाला उपदेशही करू नये.’ मराठीत म्हण आहे, ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ किंवा ‘पी हळद आणि हो गोरी !’, या म्हणींचा ‘थोड्याशा ज्ञानाने आपण खूप ज्ञानी झाल्यासारखे वाटणे’, असा अर्थ आपल्या लक्षात येतो.
२ ई. अर्धवट ज्ञानाचा फार मोठा आणि विपरीत परिणाम होत असतो ! : याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील वीर अभिमन्यू. अभिमन्यूला ‘चक्रव्यूह’ ही सैन्याची पूर्ण रचना ठाऊक नव्हती. ‘चक्रव्युहाच्या आत कसे जायचे ?’, एवढे त्याला ठाऊक होते; पण ‘चक्रव्युहाच्या बाहेर कसे यावे ?’, याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे त्या युद्धात अभिमन्यूला स्वत:चे अमूल्य प्राण गमवावे लागले.
२ उ. ‘ज्ञान कुठे, किती आणि कसे वापरावे ?’, हेही कळणे आवश्यक आहे ! : दुसरी गोष्ट आहे तीन विद्वान शिष्यांची ! हे तिघेही गुरुकुलातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले. वाटेत त्यांना एक वाघ मरून पडलेला दिसला. त्यांतील पहिल्याने गर्वाने सांगितले, ‘‘मी या वाघाच्या हाडांचा सापळा पूर्वी होता, तसा करू शकतो.’’ दुसरा म्हणाला, ‘‘मी याचे संपूर्ण मांस पूर्वी होते, तसे करू शकतो’’ आणि तिसरा म्हणाला, ‘‘अरे, हे तर काहीच नाही. मी तर या वाघाला प्राणदान देऊ शकतो. याला जिवंतही करू शकतो.’’ त्या सर्वांना आपापल्या ज्ञानाचा अतिशय गर्व होता. पहिल्याने वाघाची हाडे पूर्ववत् केली. दुसर्याने त्याचे मांस पूर्वीप्रमाणे केले आणि तिसर्याने अगदी आत्मप्रौढीने त्याच्यात प्राण भरले. तो वाघ तत्क्षणी जिवंत झाला आणि त्याने तिघाही विद्वान शिष्यांवर आक्रमण करून त्यांना मारून टाकले. या गोष्टीचे तात्पर्य असे की, ज्ञान हे परिपूर्ण असावे. ‘ते कुठे, किती आणि कसे वापरावे ?’, हेही कळणे आवश्यक असते. ज्ञान असले, तरी त्याबद्दल गर्वाने फुशारक्या मारू नये.
२ ऊ. ज्ञानी माणसाचे बोलणे हळूहळू कमी होत जाऊन त्या बोलण्याचे रूपांतर मौनात होते ! : सद्गुरूंच्या कृपेने शिष्यातील सहा रिपू हळूहळू गळून पडतात आणि त्या शिष्याचे रूपांतर साध्या माणसातून एका ज्ञानी माणसात होते. त्यामुळे त्याचे बोलणे हळूहळू कमी होत जाते आणि त्या बोलण्याचे रूपांतर मौनात होते. प.पू. कलावतीआई उपमा देतांना म्हणतात, ‘‘लोणी कढवतांना त्याचा ‘कडकड’, असा आवाज येत असतो; परंतु त्याचे तुपात रूपांतर झाले की, आवाज पूर्ण थांबतो.’’
‘आत्मज्ञान होणे’, म्हणजे ‘जी चराचरात वास करते, त्या वैश्विक शक्तीचा आपण लहानसा अंश आहोत’, याची जाणीव होऊन इतर सर्वांना प्रेमाने आणि आदराने वागवणे’; म्हणून प.पू. कलावतीआई सर्व साधकांना संदेश देतात, ‘अर्धवट ज्ञानाच्या आधारावर कुणासही उपदेश करू नका, मार्गदर्शन करू नका, अधिक बोलू नका आणि जे काही सांगायचे, ते आपल्या कृतीतून सांगा.’
– पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (३०.८.२०२३)