पुणे महापालिकेचा अजब कारभार !
पुणे – शहरातील जंगली महाराज रस्त्याची (जे.एम्. रोड) दुरुस्ती आणि सुशोभिकरण यांसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांची निविदा स्थायी समितीसमोर मांडण्यात आली आहे; मात्र शहरातील हा खड्डेविरहित रस्ता असून आदर्श रस्ता म्हणून संबोधला जातो. तरीही प्रशासनाने निविदा मागवून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी लावली आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. (याविषयी महापालिका प्रशासनाने जनतेसमोर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. – संपादक)
या रस्त्याची ५ वर्षांपूर्वी पुनर्रचना करण्यात आली. ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाइन’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रस्त्याची फेररचना करण्यात आली. त्यात रस्त्याची रुंदी काही प्रमाणामध्ये अल्प झाली असल्याचे दिसून आले होते. रस्त्याची पुनर्रचना करतांना पदपथ मोठा, तसेच सायकल मार्गही प्रशस्त करण्यात आला. या कामांनंतर हा रस्ता खड्डेविरहित आहे. महापालिकेच्या ‘पथ विभागा’ची जंगली महाराज या रस्त्यावरील गरवारे चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्त्याची यापूर्वीच्या ठेकेदाराच्या कामाची समयमर्यादा संपली आहे. त्यामुळे नव्याने निविदा काढण्यात आली आहे. या रस्त्यावरील शोभेच्या झाडांची देखभाल, ‘झेब्रा क्रॉसिंग’चे पट्टे, जलवाहिनीच्या कामांमुळे झालेल्या भागांची दुरुस्ती याअंतर्गत ही कामे केली जाणार आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.