सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ शाखेच्या पथकाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई करून मद्यासह १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली येथील कार्यालयाच्या समोरच करण्यात आली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या इन्सुली शाखेच्या पथकाने बांदा शहरात केलेल्या कारवाईत मद्यासह एकूण पावणे सात लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या दोन्ही प्रकरणांत एकूण दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
इन्सुली येथे करण्यात आलेल्या कारवाईत गोवा बनावटीचे ८४ लाख रुपयांचे मद्य, त्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक आणि अन्य साहित्य मिळून एकूण १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी जयंतीलाल सोमाबाई मकवाना आणि नटुभाई मोहनभाई राठोड (दोघेही रहाणार राजकोट, गुजरात) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बांदा शहरातील श्री पिंपळेश्वर मंदिर चौकात करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख ७२ सहस्र ८०० रुपयांचे मद्य, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य मिळून एकूण ६ लाख ७२ सहस्र ८०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी शंकर महादेव मंडले (रहाणार कराड, सातारा) याला अटक करण्यात आली आहे.