मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अरेरा कॉलनी येथे अन्नपूर्णादेवीच्या मंदिरात देवीला फूल, नारळ, पेढे किंवा नैवेद्य नाही, तर चक्क ‘सॅनिटरी पॅड’ अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘हेशेल फाऊंडेशन, भोपाळ’चे संचालक दीपांश मुखर्जी या भूमिकेचे सर्मथन करत म्हणाले, ‘‘बाजारात ताज्या फुलांची किंवा हाराची किंमत साधारण १०० रुपयांवर असते. दुसर्या दिवशी ही फुले कोमेजतात. मग देवीला अर्पण केलेली हीच फुले आम्हाला नाईलाजाने कचरापेटीत टाकावी लागतात. मिठाई लोकांमध्ये वाटली जाते. तीसुद्धा काही घंटे टिकते. या सगळ्याचा विचार करूनच आम्ही भाविकांचे पैसे चांगल्या कामासाठी व्यय व्हावे, या हेतूने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आम्ही भाविकांच्या भावना, श्रद्धा जाणतो; परंतु वायफळ व्यय करणे चुकीचे आहे.’’ अन्नपूर्णादेवी मंदिरात दान केलेले ‘सॅनिटरी पॅड’ किंवा ‘मेन्स्ट्रअल कप’ (मासिक पाळीच्या वेळी वापरण्यात येणारे उपकरण) एका संस्थेच्या साहाय्याने भोपाळच्या झोपडपट्टी भागात आणि मुलींच्या सरकारी शाळांमध्ये वितरित केले जातात.
१. दीपांश मुखर्जी यांची भूमिका ही वैचारिक दिवाळखोरी आणि साम्यवादी विचारसरणी दर्शवणारी
मुखर्जी यांची वरील भूमिका अत्यंत अर्तक्य असून वैचारिक दिवाळखोरी आणि साम्यवादी विचारसरणी थोपवण्याचे, हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे एक प्रकारचे षड्यंत्रच आहे ! पैशांचा धूर्त विचार करणारा तथाकथित साम्यवादी आणि निधर्मी विचारसरणीचा परिपाक असणारा हा धर्मविसंगत निर्णय आहे. चर्च किंवा दर्गा येथे असे केले तर चालेल का ? हिंदू हे खपवून घेतात, म्हणून अशा अश्लाघ्य निर्णयाची कार्यवाही होत आहे. देवतांची मंदिरे, तसेच देवतापूजनातील कृती या धर्माधिष्ठित आहेत. ‘मनुष्याला देवतेचे तत्त्व ग्रहण करणे, देवतांचे चैतन्य मिळवणे सुलभ व्हावे’, हा मंदिराचा प्रमुख उद्देश आहे. मंदिरातून देवीच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळावा यासाठी देवीला सुगंधित पुष्पे, नैवेद्यरूपी सात्त्विक पदार्थ अर्पण करणे, नारळ वाढवणे, तसेच देवीची ओटी भरणे, अशा प्रकारच्या कृती धर्माने करण्यास सांगितल्या आहेत.
फुलांसह देवपूजेमध्ये वापरण्यात येणारी सामुग्री भावपूर्णपणे प्रार्थना करून देवतेला अर्पण केल्यास त्या सामुग्रीच्या सात्त्विकतेमुळे देवतेकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्यलहरी नैवेद्य, पुष्प यांमध्ये आकृष्ट होतात आणि मनुष्याला देवतांचे चैतन्य मिळवणे सुलभ होते. त्यामुळे वायुमंडल शुद्ध होते. निरनिराळी फुले देवतेकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्य लहरी ग्रहण करून पूजकाकडे प्रक्षेपित करण्याचे कार्य करतात. फुलाफुलांमध्ये देवतांचे तत्त्व वास करते; म्हणूनच फुले चैतन्य प्रक्षेपित करतात. फुलांनी सजवलेले देवघर किंवा मंदिराचे गर्भगृह दर्शन घेणार्याचे मन प्रसन्न करते. हा उद्देश इतर वस्तूंनी साध्य होणार आहे का ? मंदिरे ही ईश्वरी चैतन्याचे प्रमुख स्रोत आहेत. भाविकांना चैतन्य देणे, हा मंदिराचा उद्देशच बाधित होत असेल, तर या निर्णयाचा पुनर्विचार होऊन तत्परतेने सुधारणा अत्यावश्यक आहे. अन्यथा भाविकांना याविरोधात आवाज उठवावा लागेल.
२. समाजसेवेसाठी धर्मकार्यात हस्तक्षेप करणे चुकीचेच !
धर्मसेवा आणि समाजसेवा यांत गल्लत होता कामा नये. धर्माची सेवा ही धर्माने घालून दिलेल्या चौकटीत राहूनच व्हायला हवी. समाजसेवा कुणी करावी किंवा करू नये ? ती कशी करावी ? यावर कुणाचा आक्षेप नाही. भाविकांनी किंवा मंदिर समित्यांनी काय दान करावे ? हा एक वेगळा प्रश्न आहे; परंतु देवनिधी हा केवळ देव आणि धर्म यांच्या कार्यासाठीच व्यय होणे अपेक्षित आहे. समाजसेवेसाठी देवतापूजनातील धर्माधिष्ठित कृतींना फाटा देणे, हा धर्मकार्यात हस्तक्षेप आहे. धार्मिक कृती या शास्त्राने आखून दिलेल्या नियमावलीप्रमाणेच होणे सयुक्तिक आहे. समाजसेवेचे माध्यम म्हणून शाळेत जाऊन कुणी तेथील नियमांचे उल्लंघन करत नाही किंवा तेथील कार्यपद्धतीमध्ये हस्तक्षेप करत नाही. इतकेच काय, तर रुग्णालयात जाऊन तेथील शिस्तीचे पालन करतच समाजसेवा केली जाते, मग मंदिरांमध्ये मनमानीपणा का ? रुग्णालये, न्यायालय अथवा शैक्षणिक क्षेत्रात काही पालट करायचे अथवा सुचवायचे असल्यास त्या त्या क्षेत्रांतील तज्ञ मंडळींना विचारणा केली जाते, तसे धार्मिक गोष्टींत का होत नाही ?
३. धर्मक्षेत्रातील ही ढवळाढवळ थांबवण्यासाठी भाविकांचे संघटन आवश्यक !
भाविक देवतेच्या दर्शनाला मंदिरात येतात, ते त्यांच्या श्रद्धेपोटी ! त्यांच्या श्रद्धांचे भंजन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा असात्त्विक कृतींमुळे मंदिराचे, गर्भगृहाचे पावित्र्य नष्ट होते. त्यामुळे मंदिरात मांगल्य टिकवून ठेवणार्या सात्त्विक कृतीच केल्या जाव्यात. गेल्या काही वर्र्षांत या संदर्भात पुरोगामी विचारसरणीच्या पुढारलेल्या, तथाकथित सुशिक्षितांकडून शबरीमला मंदिर, शनीशिंगणापूरचे शनीमंदिर या मंदिरांमध्ये रजस्वला, तसेच स्त्रियांना प्रवेश मिळावा, या संदर्भात अनेक आंदोलने झाली. धर्मक्षेत्रातील ही ढवळाढवळ निश्चितच थांबायला हवी. यासाठी सर्व भाविक भक्तांनी संघटितपणे प्रभावी चळवळ उभी करून मंदिर सरकारीकरणाचे हे दुष्परिणाम दूर करणे अत्यंत आवश्यक आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.