गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा निघणार !

१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन

१९९० ची रथयात्रा (संग्रहित छायाचित्र)

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा गुजरातमधून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढण्यात येणार आहे. ८ जानेवारीपासून ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून मार्गक्रमण करणार आहे. २० जानेवारी या दिवशी ही रथयात्रा अयोध्येला पोचेल. कर्णावतीच्या ‘रामचरित मानस ट्रस्ट-नुरानिप’ या संस्थेने या रथयात्रेचे आयोजन केले आहे. अयोध्येत पोचल्यानंतर ट्रस्टकडून श्री रामललाला ५१ लाख रुपये अर्पण करण्यात येणार आहे. यापूर्वी १९९० च्या दशकात लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंग ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. या रथयात्रेनंतरच श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन संपूर्ण भारतात पोचले होते.

अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला न येण्याची श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची विनंती

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी मोठा लढा उभारणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना जानेवारीत होणार्‍या श्रीरामंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत येऊ नये, अशी विनंती केली आहे. श्रीराममंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी ही माहिती दिली.

लालकृष्ण अडवाणी ९६ वर्षांचे आहेत आणि मुरली मनोहर जोशी जानेवारीत ९० वर्षांचे होतील. ट्रस्टचे म्हणणे आहे की, दोघेही ज्येष्ठ असून त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना ही विनंती करण्यात आली आहे, जी त्यांनी मान्य केली आहे.