ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयात सादर !

अहवाल सार्वजनिक करण्याची हिंदु पक्षाची मागणी, तर मुसलमान पक्षाचा विरोध !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा सीलबंद अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सादर केला. अहवाल सादर करतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. मुसलमान पक्षाकडून ‘हा अहवाल सार्वजनिक करण्यात येऊ नये’, अशी या वेळी मागणी करण्यात आली. त्याला हिंदु पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. अनुमाने १ सहस्र ५०० पानांचा हा अहवाल असल्याचे सांगितले जात आहे. ‘हा अहवाल सीलबंद सादर करावा’, अशी मागणी करणारी याचिका मुसलमान पक्षाच्या वतीने यापूर्वीच न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

सौजन्य न्यूज 18 यूपी उत्तराखंड 

३० नोव्हेंबरला ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी पुरातत्व विभागाने ३ आठवड्यांचा वेळ मागितला होता. यावर न्यायालयाने १० दिवसांचा वेळ दिला होता. यानंतर पुन्हा वेळ वाढून मागितला होता. अखेर १८ डिसेंबरला हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानंतर १०० दिवस ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणाच्या वेळी हिंदु आणि मुसलमान या दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  सर्वेक्षणाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.