‘सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी साधनेत आल्यापासून प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रत्यक्ष सहवासात आणि सत्संगात आहेत. प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना आणि अध्यात्म यातील एकेक पायरी अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण पद्धतीने चढत संतपदावर आरूढ झालेले ते संतरत्न आहेत. ज्यांनी सनातन संस्थेचा आरंभ जवळून बघितला आणि प.पू. गुरुदेवांच्या समवेत अध्यात्माचा प्रवास करत जे पुढे आले, ते पू. संदीपदादा ! मला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे, त्यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. पू. संदीप आळशी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. पू. संदीप आळशी यांचे बोलणे ऐकून मनातील विचारांचे निराकरण होणे आणि त्यांच्या सत्संगात साधनेला दिशा मिळणे : ‘पू. संदीपदादांना प.पू. गुरुदेवांची शिकवण वेगळी अशी शिकवावी लागत नाही. त्यांना बघताच खरोखर ‘साधनेची तळमळ आणि साधना’ हेच जीवनाचे अंतिम ध्येय असणार्या साधकाला ते आपोआपच जाणवते. असे मी पुष्कळ वेळा अनुभवले आहे. माझ्या मनात साधनेविषयी काही प्रश्न असतांना किंवा एखाद्या प्रसंगात योग्य-अयोग्य याविषयी मला समजत नसतांना माझी पू. दादांशी भेट झाल्यास ते सहजतेने त्याच प्रसंगाला अनुरूप अशी सूत्रे सांगतात. त्यामुळे माझ्या मनातील विचारांचे निराकरण होते. ‘संत सर्वज्ञ असतात’, हे वचन पू. दादांच्या संदर्भात, तसेच सनातनचे सर्वच संत आणि सद्गुरु यांच्या संदर्भात सार्थ ठरते. ‘प.पू. गुरुदेवांचे प्रत्येक साधकाकडे लक्ष असते आणि देव कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून साधकापर्यंत योग्य ते पोचवतो’, हेच सत्य आहे.
१ आ. पू. संदीपदादांच्या सत्संगात बहिर्मुखता अल्प होऊन अंतर्मुखता वाढणे : पू. संदीपदादा आश्रमात सहजतेने वावरतात. प.पू. गुरुदेवांच्याच कृपेने मला अनेक वर्षांपासून पू. दादांच्या सत्संगाचा लाभ होत आहे. त्यांचा काही क्षणांचा सत्संगही एक पर्वणीच असते. त्या काही क्षणांत ते सहजतेने साधकांच्या मनात साधनेविषयी जागरूकता निर्माण करतात. ‘माझी बहिर्मुख वृत्ती त्यांच्या काही क्षणांच्या सत्संगातही अंतर्मुख होते’, असे मला अनेक वेळा जाणवते.
१ इ. पू. संदीपदादांशी बोलतांना प्रतिमेचे विचार मनात न येणे आणि त्यांनी साधनेसंदर्भातील सूत्रे सोप्या भाषेत समजावून सांगणे : पू. संदीपदादांशी मला माझ्या साधनेविषयी सहजतेने बोलता येते. माझ्या मनात पू. दादांशी बोलतांना ‘मी कसे बोलू ? त्यांना माझ्याविषयी काय वाटेल ? त्यांना आवडेल का ?’ अशा प्रकारचे स्वत:च्या प्रतिमेविषयी विचार कधीच येत नाहीत. पू. दादांना दैनंदिन साधनेविषयी किंवा पू. वामन (सुपुत्र आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर, वय ५ वर्षे) आणि कु. श्रिया (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १२ वर्षे) यांच्याविषयी विचारल्यावर ते लगेचच त्या संदर्भात मला सोप्या भाषेत समजावून सांगतात आणि ‘प.पू. गुरुदेवांनी त्या प्रसंगाकडे कसे बघितले असते’, हेही सहजतेने सांगतात.
१ ई. पू. संदीपदादांनी लिहिलेली प्रत्येक चौकट आणि लेख यांतून शिकता येणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. दादांनी लिहिलेली प्रत्येक चौकट आणि विविध लेख यांतून आम्हाला, तसेच श्रिया आणि पू. वामन यांनाही ‘साधनेविषयी विचार आणि चिंतन कसे करायचे ?’, हे शिकायला मिळते. ‘स्वतःची साधना योग्य मार्गाने चालू आहे कि नाही ?’, हेही पू. दादांनी लिहिलेल्या चौकटींतून (लिखाणातून) सहजतेने लक्षात येते. (उदा. पू. दादांनी लिहिलेली आध्यात्मिक स्तराविषयीची कविता, गुरुसेवा करतांना ठेवायचा भाव, साधक म्हणून मायेतील गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन, नामजप करण्याबद्दल इत्यादी.)
२. पू. संदीप आळशी यांच्यातील गुणांचे घडलेले दर्शन
पू. संदीपदादांमध्ये सहजता, साधेपणा आणि निर्मळता असे अनेक गुण आहेत.
२ अ. प्रीती : पू. दादांची भेट झाल्यावर ते आपलेपणाने बोलतात आणि पुष्कळ प्रेमाने विचारपूस करतात.
२ आ. आधार वाटणे : मी त्यांना पू. वामन यांच्या संदर्भातील लिखाणाविषयी सांगते. तेव्हा ते मला सांगतात, ‘‘पू. वामन यांच्या संदर्भातील प्रत्येक सूत्र बारकाईने लिहून ठेवायला हवे, उदा. संतांचे बालपण कसे असते ? त्यांच्या बाललीलांमधून त्यांचे संतत्व कसे प्रकट होते ?’’ पू. दादा मला पू. वामन यांच्या संदर्भातील प्रत्येक सूत्राची नोंद करायला सांगतात. ते मला प्रेमाने सांगतात, ‘‘पू. वामन यांच्याविषयी लिहिणे, त्या संदर्भातील छायाचित्रे काढणे, ध्वनीमुद्रण आणि चित्रीकरण इत्यादी करून ठेव. आमच्याविषयी आता काहीच माहिती मिळत नाही. छायाचित्रे इत्यादी नाहीत. आपण प.पू. गुरुदेवांकडून शिकायचे. त्यांनी स्वत:विषयी लिखाण, छायाचित्रे, कात्रणे जपून ठेवली आहेत. त्यामुळे आपल्याला तेवढे तरी बघायला मिळते.’’ पू. संदीपदादांशी बोलल्यावर मला आधार वाटतो.
२ इ. जिज्ञासा : पू. संदीपदादांमध्ये जिज्ञासा पुष्कळ प्रमाणात आहे. ते प्रत्येक लहान गोष्टही समजून घेतात. ते संत असूनही त्यांना साधकांकडून एखादे सूत्र समजून घ्यायला कोणतीच अडचण वाटत नाही. ‘आपल्यात जिज्ञासा असेल, तरच आपण समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीट ऐकून समजून घेऊ शकतो’, असे मला त्यांच्या या गुणामुळे शिकायला मिळाले. आपल्यातील ‘जिज्ञासा’ या एका गुणामुळे आपल्यात ‘समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे, इतरांना समजून घेणे, स्वत:कडे न्यूनता घेणे, नम्रता, शिकण्याची वृत्ती, दुसर्यांविषयी प्रीती’ असे गुण वाढतात, तसेच आपल्यातील अहं आणि स्वभावदोष आपोआपच न्यून होतात. आपण आनंदी रहातो आणि महत्त्वाचे म्हणजे गुरूंच्या अनुसंधानात रहातो. याचे उदाहरण म्हणजे मी पू. दादांना पू. वामन यांचे खेळणे, बोलणे किंवा एखाद्या आध्यात्मिक स्तरावरील सूत्रे यांविषयी सांगते, तेव्हा ते लक्षपूर्वक पूर्ण सूत्र ऐकून घेतात आणि जिज्ञासेने त्याविषयी मला प्रश्नही विचारतात. ते कधीच कोणतीच सूत्रे केवळ ‘वा, वा, छान छान’, असे म्हणून सोडून देत नाहीत. त्यांना तातडीची सेवा असेल, तर ते मला आठवणीने सांगतात, ‘‘नंतर याविषयी सर्व सांग.’’ नंतर ते सूत्राविषयी जाणूनही घेतात.
२ ई. भाव
२ ई १. दैवी बालकांविषयी भाव : पू. संदीपदादा मला नेहमी म्हणतात, ‘‘तुमची पूर्वजन्माची साधना आहे; म्हणून देवाने तुम्हाला दोन दैवी बालकांचे दायित्व दिले आहे. ‘आताच्या काळात कु. श्रियासारखी शांत, समंजस आणि गुणी मुलगी अन् पू. वामन यांच्यासारखे बालसंत लाभणे’, हे केवळ अशक्यच आहे. अशा दैवी बालकांचे संगोपन करणे, त्यांचे आई-वडील या नात्याने दायित्व पार पाडणे आणि त्यांच्यावर संस्कार करणे, हेही कठीण आहे.’’ त्याच वेळी ते मला ‘‘काळजी करू नकोस. प.पू. गुरुदेव आहेत ना ! तेच सर्व करून घेतील’’, असे सांगून आश्वस्तही करतात. पू. दादा ‘श्रियामध्ये काय पालट झाले आहेत आणि तिची साधना चांगली चालू आहे’, असे सांगत असतांना ‘तिला साधनेत आणखी कसे शिकवायला हवे’, याविषयीही सांगतात. पू. दादा पू. वामन यांच्या संदर्भातही सांगतात.
२ ई २. प.पू. गुरुदेवांप्रती असलेला बालकभाव आणि कृतज्ञताभाव : पू. संदीपदादा म्हणतात, ‘‘आम्हाला स्वत:विषयीचे लिखाण आणि लहानपणीची छायाचित्रे जपून ठेवणे, असे कधी सुचलेच नाही. तेव्हा मी पुढे साधना करीन, (साधना करत संत होईन) असे काही ठाऊक नव्हते. प.पू. गुरुदेवांचे तसे नाही. ते असामान्यच आहेत. त्यांनी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची नोंद करून ठेवली आहे आणि त्याचे योग्य रितीने जतनही केले आहे. आपण नेहमी त्यांच्या लहान गोष्टी आणि कृती यांमधून शिकायचे आहे. ही आपली साधना आहे.’’ पू. संदीपदादा प.पू. गुरुदेवांविषयी बोलत असतांना त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती असलेला बालकभाव आणि कृतज्ञताभाव जाणवत होता. ते निरागस बालकाप्रमाणे सांगत असतात, ‘‘गुरुदेव किती थोर आहेत !’’ आणि त्याच वेळी सामान्य बालकाप्रमाणे स्वत:कडे न्यूनता (नम्रता) घेतात.’
३. पू. संदीपदादांच्या सत्संगात येणार्या अनुभूती
३ अ. सुगंध येणे : पू. संदीपदादांच्या भोवती मंद असा सुगंध दरवळतो. ‘काही वेळा हा सुगंध चंदनाचा, तर काही वेळा केवड्याचा आहे’, असे मला जाणवते. या सुगंधाने मन प्रसन्न होते.
३ आ. ‘पू. संदीपदादांच्या भाेवती निळ्या आणि पांढर्या या रंगाची गोल वलये आहेत’, असे जाणवणे : रामनाथी आश्रमात होणार्या यज्ञाच्या वेळी मी पू. वामन यांना घेऊन पू. संदीपदादांच्या बाजूच्या आसंदीवर बसते. त्या वेळी
‘पू. दादांच्या भोवती निळ्या आणि पांढर्या या रंगांची गोल वलये आहेत’, असे मला जाणवते. ‘मीही त्याच वलयात आहे’, याची अनुभूती येऊन माझ्या मनाला एकदम शांतता आणि स्थिरता जाणवते.
३ इ. पू. संदीपदादा भेटल्यावर मनातील विचार थांबून हलकेपणा जाणवणे : पू. संदीपदादांशी बोलल्यावर मला हलकेपणा जाणवतो. खरेतर मी पू. दादांशी थोडा वेळच बोलते, तरीही त्यांचा सत्संग आणि चैतन्य यांचा परिणाम माझ्या मनावर होतो. माझा उत्साह वाढतो. ‘काही वेळा आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत ?’, हे आपल्याला कळत नाहीत. अशा वेळी पू. दादा भेटल्यावर माझ्या मनातील सर्व विचार थांबतात. मला हलकेपणा जाणवतो.
४. कृतज्ञता
ही सूत्रे लिहिण्याची प्रेरणा देणार्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘पू. संदीपदादा, आपल्या सत्संगातून मला साधनेची मूलतत्त्वे शिकता येऊ देत आणि ती आचरणात येऊ देत’, अशी आपल्या आणि प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
कृतज्ञता !’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (२८.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |