कोरोनामुळे आईचे निधन झाल्यावरही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून स्थिर रहाणार्‍या सौ. रूपाली बिजूर !

१. कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे चिंता वाटणे आणि प्रार्थना केल्यावर स्थिर रहाता येणे

सौ. रूपाली बिजूर

‘माझी आई (सौ. कुसुम भोसले, वय ७५ वर्षे), वडील (श्री. रमण भोसले) आणि भाऊ अशा तिघांनाही कोरोना झाला आहे, हे कळल्यावर आरंभी मला फार चिंता वाटली; परंतु मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्यावर मला स्थिर रहाता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर आईकडे जाता येणे आणि आईची सेवा करता येणे

त्यानंतर माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आणि मला तिच्या सेवेसाठी जावे लागले. तिच्याकडे जातांना माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार आले, उदा. मलाही कोरोना झाला, तर काय करणार ? त्या वेळी मला गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आधार दिला. मी गुरुदेवांना सतत प्रार्थना करून त्यांच्या अनुसंधानात रहात होते. यामुळे माझे मन आईकडे जाण्यासाठी सिद्ध झाले. मला एक आठवडा आईची सेवा करावी लागली. तिची सेवा करूनही मला कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे माझ्या मनातील कोरोनाची भीती गेली.

३. रुग्णालयात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि दुर्गामाता यांना प्रार्थना करणे

मी रुग्णालयात गेल्यावर प.पू. गुरुदेव आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सतत प्रार्थना करत होते. ‘श्रीचित्‌शक्ति गाडगीळकाकूंचे माझ्याकडे सतत लक्ष आहे’, असे मला वाटायचे. तसेच आईचा कोरोनाचा संसर्ग बरा व्हावा; म्हणून मी श्री दुर्गामातेला प्रार्थना केली. तेव्हा ‘आईचा अंत्यसंस्कार चालला आहे आणि दुर्गामाताही आईला नमस्कार करत आहे’, असे चित्र मला दिसले.

४. अकस्मात् पाऊस पडल्याने आईच्या पार्थिवाला अंघोळ होणे

आईच्या निधनानंतर ‘तिला झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे पार्थिवाला अंघोळ घालता येणार नाही’, असा विचार माझ्या मनात आला. आईचे पार्थिव रुग्णालयाच्या बाहेर आणून ते रुग्णवाहिकेत नेतांना अकस्मात् पाऊस आला. ‘वरूणदेवतेच्या कृपेने आईची अंघोळ झाली’, असे मला वाटले.

५. घरून विरोध असतांनाही नामजप करणे आणि धर्मकार्यास साहाय्य करणे

माझी आई फार सात्त्विक होती. ती नामजप करायची. तिला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहाण्याची फार इच्छा होती. ती नेहमी परेच्छेने रहायची. तिची सहनशक्ती पुष्कळ होती. आई दैनिक ‘सनातन प्रभात’ घेत असे. त्याला माझ्या वडिलांचा विरोध असायचा. ते केवळ उदबत्ती आणि कापूर घेत असत. आई कुणाला न सांगता अर्पण द्यायची. तिने सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथही घेतला होता.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे

माझ्या आईची प.पू. गुरुदेवांवर फार श्रद्धा होती. ती ‘गुरुदेवांनी कोणता नामजप सांगितला आहे’, असे मला विचारून नामजप करायची. आईच्या निधनापूपूर्वी मी तिला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले आणि म्हणाले, ‘‘हे कोण आहेत, ते ओळखलेस का ?’’ तेव्हा तिने ‘हो’, असे म्हणून मान हलवली.

वरील सर्वकाही केवळ आणि केवळ माझ्या गुरुमाऊलींच्या अपार परम कृपेमुळेच शक्य झाले. त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. रूपाली बिजूर, बागलकोट रोड, विजापूर, कर्नाटक. (१८.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक