हल्ली लहान मुलांवर वाढत असलेल्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणे पाहता लहान मुलांना ‘गुड टच आणि बॅड टच’च्या (चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श) संकल्पनेतून जागरूक करण्याचा, त्यांना त्याविषयी ज्ञान देण्याचा प्रयत्न बर्याच स्तरावर मोठ्या प्रमाणात होत आहे. काळाची आवश्यकता म्हणून जरी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, यात दुमत नाही. तरीही यासारख्या शिकवणीमुळे लहान मुलांच्या निरागस, सुंदर बालविश्वाला मात्र काहीसा तडा जाऊ शकतो, हे नाकारून चालणार नाही; पण दुर्दैवाने ही वेळ आजच्या काळात आली आहे. लहान मुलांना त्याविषयी सूचक ज्ञान देणे चूक आहे, असे नव्हे; परंतु त्याहीपेक्षा ज्यामुळे त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे, त्याच्या मुळावरच घाव घालणे अधिक योग्य नव्हे का ?
खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या शाळेतील निरागस मुलांना या वयात लैंगिक शिक्षणाविषयी जागरूक करावे लागणे, हे सुदृढ समाजाच्या दृष्टीने खचितच चांगले लक्षण नव्हे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीविषयी मुलांची दृष्टी दूषित आणि संशयित होऊ शकते. निखळ हास्य जाऊन त्याची जागा भीती, असुरक्षितता आणि संशय या गोष्टी घेऊ शकतात. याविषयीचे विचार अधिक वाढले, तर लहान मुलांच्या मुक्त हसर्या निरागस चेहर्यावर त्याचा वेगळाच परिणाम होऊ शकतो. मुले लहानपण अनुभवू शकणार नाहीत किंवा जगू शकणार नाहीत. ‘मुले ही देवाघरची फुले आहेत’, ‘ती भगवंताची रूपे आहेत’, असे समजूनच लहान मुलांमध्ये ईश्वराचे रूप बघणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळेच हिंदु धर्मात ‘कुमारिका पूजना’ची प्रथा आहे.
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहोत. समाज त्यागापेक्षा भोगाकडे वळल्यामुळे ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीच्या अगदी विरोधी ठरणारी अन् लाजिरवाणी अपकृत्ये समाजात दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. समाज या स्तरावर कधी आला, हे काळाच्या ओघात समजलेच नाही. समाजातील नैतिकता हरवून लैंगिकता वाढत चालली आहे, हेच यावरून लक्षात येते. जुलमी मोगल नवाब वजीर खानच्या अत्याचाराविरुद्ध दंड थोपटणार्या ७ वर्षीय बाबा जोरावर सिंग आणि ९ वर्षीय बाबा फत्तेसिंग यांचा आदर्श मुलांसमोर ठेवून मुलांना लहानपणापासूनच स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे देणे हाही त्यावरील एक उपाय आहे; परंतु समाजाला साधना शिकवून संयमी आणि अंतर्मुख बनवणे हा या समस्येच्या मुळावरज घाव घालणारा एकमात्र उपाय आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे