|
बेंगळुरू (कर्नाटक), १७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या संघटित शक्तीचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेले श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, हे आहे. वर्ष २०१६ मध्ये रायचूर येथे मिनारची दुरुस्ती करतांना तिथे मंदिराचा खांब आढळून आला. त्याचप्रमाणे मंगळुरू येथील एका मशिदीचे नूतनीकरण करतांना मंदिराचे अवशेष सापडले. हिंदू संघटनांनी संघटित होऊन ज्याप्रमाणे श्रीराममंदिर बांधले, त्याचप्रमाणे अन्यत्र मंदिरे बांधणे का शक्य होणार नाही ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित केला.
ते कर्नाटक मंदिर-मठ आणि धार्मिक संस्था महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १६ आणि १७ डिसेंबरला बेंगळुरू येथील ‘गंगम्मा तिम्मय्या कन्व्हेशन सेंटर’ येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेत बोलत होते. आदिचुंचनगिरी मठाचे पू. श्री श्री सौम्यनाथ स्वामीजी, भारतीय संप्रदाय ट्रस्टचे डॉ. महर्षी गुरुजी, अधिवक्ता श्री. अशोक हारंहळ्ळी आणि सनातन संस्थेचे पू. रमानंद गौडा यांनी परिषदेचे उद्घाटन केले.
राज्यातील ५०० मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प करूया ! – श्री. मोहन गौडा, राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
आज प्रत्येक क्षेत्रात एक शिष्टाचार चालतो. पोलीस, शासकीय कार्यालये, शाळा यांसह अनेक ठिकाणी त्यांचा गणवेष घालूनच जावे लागते. त्यामुळे हिंदूंच्या मंदिरांत जाण्यासाठीही एक वस्त्रसंहिता असायला हवी. मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू केली, तर दर्शन करणार्यांना मंदिरांतील सात्त्विकतेचा संपूर्ण लाभ होऊ शकतो. त्यासाठी पुढील काळात आपण सर्व जण एकजूट होऊन कर्नाटक राज्यातील ५०० मंदिरांंमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा संकल्प करूया.
संतांच्या संदेशाचे वाचन आणि व्हिडिओद्वारे प्रसारण !
परिषदेच्या प्रारंभी या परिषदेनिमित्त सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. यासह ‘जगद्गुरु शंकराचार्य दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी’चे श्री श्री विधूशेखर भारती स्वामीजी आणि रामचंद्रापूर मठाचे श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेंद्र भारती स्वामीजी यांनी दिलेल्या संदेशांचे व्हिडिओ दाखवण्यात आले.
वर्ष २०२४ च्या कन्नड सनातन पंचांगाच्या अॅपचे लोकार्पण
या वेळी वर्ष २०२४ च्या कन्नड भाषेतील सनातन पंचांगाच्या अॅपचे लोकार्पण मान्यवरांच्या करण्यात आले.“
हिंदु जनजागृती समितीच्या कन्नड भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण !या शुभप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कन्नड भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पणही मान्यवरांच्या करण्यात आले. यामुळे आता हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषांनंतर कन्नड भाषिक धर्मप्रेमींनाही राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, हिंदूसंघटन, आदी विषयांविषयी त्यांच्या मातृभाषेत दिशादर्शन मिळू शकणार आहे. यासह संकेतस्थळाकडून राबवण्यात येणार्या जागृतीपर मोहिमांमध्ये त्यांना सहज सहभागही नोंदवता येणार आहे. हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ वर्ष २००७ पासून कार्यरत असून गेल्या १६ वर्षांपासून जगभरातील लक्षावधी हिंदूंमध्ये या माध्यमातून जागृती झाली आहे. संकेतस्थळाशी संपर्क साधून सहस्रावधी हिंदूंनी धर्मकार्यात योगदान देण्यास आरंभही केला आहे. यांतर्गत अनेक अधिवक्ते, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, उद्योगपती, निवृत्त सैन्याधिकारी, विद्यार्थी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंचा समावेश आहे. केवळ भारतच नव्हे, तर नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, थायलँड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, जर्मनी, ब्रिटन, स्वीडन, अमेरिका, कॅनडा आदी अनेक देशांतून संकेतस्थळाशी संपर्क साधण्यात आला आहे. यातून समितीच्या कार्याप्रती हिंदु समाजात असलेला विश्वास लक्षात येतो. कन्नड भाषेतील नूतन संकेतस्थळाची मार्गिका : HinduJagruti.org/kannada |