१. जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सिद्धता करण्याची सेवा मिळणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करून सेवेला प्रारंभ करणे
‘२५.१२.२०२२ या दिवशी ‘जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आहे’, हे आम्हाला कळले. २६.११.२०२२ या दिवशी उत्तरदायी कार्यकर्त्यांनी आमचे सेवेचे नियोजन केले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुष्कळ चांगले मार्गदर्शन मिळाले. ‘आम्हाला सभेच्या सिद्धतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे’, हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. आतापर्यंत मी केवळ सभा ऐकली होती. मला काहीच विशेष अनुभव नसतांना सेवा करण्याची संधी मिळाली होती. मी श्री गुरुमाऊलीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी शरण जाऊन प्रार्थना केली, ‘देवा, आतापर्यंत मी कधी सभेशी संबंधित सेवा केली नाही, तर आता तूच माझ्याकडून ही सेवा करून घे’ आणि १.१२.२०२२ पासून मी सेवेला आरंभ केला. तेव्हा माझ्या मनात ‘समाजात कसे जायचे ? काय सांगायचे ?’, असे विचार येऊ लागले.
२. ‘श्री गुरुदेव समवेत आहेत’, असा भाव ठेवून बैठक ठरवणे, सभेतील सेवेतून आनंद मिळणे
‘आपल्या समवेत श्री गुरुदेव आहेत’, असा भाव ठेवून मी एका बैठकीचे नियोजन केले. त्यानंतर सेवेत काही अडचण आली नाही; कारण माझ्या समवेत श्री गुरुदेव होते. त्यानंतर माझ्या मनात ‘आता आपली सेवा परिपूर्ण कशी होईल ?’, असा विचार येऊ लागला. सेवा करतांना मला यापूर्वी कधीही न मिळालेला आनंद मिळत होता. २५.१२.२०२२ या दिवशी शिवतीर्थ पटांगणातील सेवेच्या वेळेचे क्षण मी कधीच विसरू शकत नाही. सभा फार चांगली झाली. सभेच्या सेवेतून मला पुष्कळ आनंद मिळाला. सभा झाल्यावर रात्रीही आम्ही सेवा करत होतो.
३. सभेची सेवा करत असतांना स्वतःला कर्करोग असल्याचा विसर पडणे, छातीमध्ये त्रास होऊ लागल्यावर आधुनिक वैद्यांनी चाचण्या करण्यास सांगणे आणि वैद्यकीय अहवालानुसार छातीमध्ये गाठ असल्याचे कळल्यावरही काहीही ताण न येणे
२६ आणि २७.१२.२०२२ या दिवशी मला थोडा थकवा जाणवत होता आणि तापही आला होता. वैद्यांना दाखवून मी २ दिवस विश्रांती घेतली. २८.१२.२०२२ या दिवशी सभेचा आढावा होता. तेथेही थोडी सेवा केली. मग २८.१२.२०२२ ते २.१.२०२३ पर्यंत थोडी फार सेवा केली. या कालावधीत ‘मला कर्करोग आहे’, हे माझ्या लक्षातही आले नाही. ४ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे माझे एक मूत्रपिंड काढले होते. ३.१.२०२३ या दिवशी माझ्या छातीत दुखत होते. मी नाशिक येथील आधुनिक वैद्यांना संपर्क केला. त्या वेळी त्यांनी मला ‘HRCT स्कॅन’ (हाय रिझोल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी, ज्यामध्ये छातीचे परीक्षण केले जाते) करण्यास सांगितले. ‘स्कॅन’ केल्यावर एक दिवसाने वैद्यकीय अहवाल आला. तेव्हा कळले की, छातीमध्ये माझ्या तिसर्या फासळीत काही तरी अडचण आहे. त्यांनी मला वैद्यकीय अहवाल आधुनिक वैद्यांना लवकर दाखवण्यास सांगितले. तेव्हा मी ६.१.२०२३ या दिवशी नाशिक येथे आधुनिक वैद्यांना वैद्यकीय अहवाल दाखवला. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमच्या छातीत गाठ आहे. तुम्हाला शस्त्रकर्म करावे लागेल. त्या वेळी मला काहीही ताण आला नाही. मी रात्री नाशिकहून जळगावला आलो.
४. वैद्यकीय अहवाल पाहून रामनाथी, गोवा येथील आधुनिक वैद्यांनी त्वरित शस्त्रकर्म करण्यास सांगणे आणि नामजपादी उपायही करण्यास सांगणे
७.१.२०२३ या दिवशी सकाळी जळगावला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ होता. तेथेही मी सेवेला गेलो. त्या वेळी एका साधकांची भेट झाली. त्यांनी माझ्या प्रकृतीविषयी जाणून घेतले. तेव्हा त्यांनी मला धीर दिला आणि सांगितले, ‘‘दादा, काही काळजी करू नका. आपले गुरुदेव आहेत ना ?’’ त्या वेळी साधकांनी मला वैद्यकीय अहवाल पाठवण्यास सांगितले. मी त्यांना वैद्यकीय अहवाल पाठवले. त्यानंतर साधकांनी सांगितले, ‘‘दादा, तुमचे वैद्यकीय अहवाल रामनाथी आश्रमात पाठवले होते. आधुनिक वैद्य डॉ. पांडुरंग मराठे यांनी तुमचे वैद्यकीय अहवाल बघून सांगितले, ‘‘आपण वेळ न घालवता शस्त्रकर्म केले पाहिजे.’’ त्यांनी आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी नामजप करण्यास सांगितले. त्या वेळेपासून मी नामजप करण्याचा प्रयत्न करू लागलो; पण माझ्याकडून अपेक्षित असा नामजप होत नव्हता.
५. परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर शस्त्रक्रियेच्या वेळी नामजप आपोआप होणे आणि कसलाही ताण न येणे
१०.१.२०२३ या दिवशी मी नाशिकला गेलो. तेथे आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती करून घेतले. दुपारी २ वाजेपर्यंत शस्त्रक्रियेची सिद्धता झाली, तरीही माझा सांगितलेला नामजप होत नव्हता. प्रयत्न करूनही आपला नामजप होत नाही. तेव्हा मी उत्तरदायी साधकाला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आता मी शस्त्रकर्मासाठी जात आहे, तरीही माझा नामजप होत नाही.’’ रुग्णालयातील कर्मचारी मला चाकाच्या आसंदीवरून (‘व्हिलचेअर’) घेऊन न्यायला आले. त्या वेळी मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांना प्रार्थना केली, ‘देवा, गुरुमाऊली आता मी शस्त्रकर्मासाठी जात आहे. ‘पुढे काय होईल ?’ हे मला ठाऊक नाही. आता तुम्हीच माझ्या समवेत आहात. कळत-नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर तुम्ही मला क्षमा करा.’ त्यानंतर मला शल्यचिकित्सा विभागामध्ये आणले. तेव्हापासून माझ्याकडून नामजप आपोआप होऊ लागला. ३ ते ५ वाजेपर्यंत शस्त्रकर्म चालू होते. ६ वाजल्यानंतर मला थोडी शुद्ध आली. तेव्हाही माझा नामजप चालू होता. नामजप करत असतांना ‘मला केव्हा झोप लागली आणि केव्हा जाग आली ?’, हेसुद्धा मला कळत नव्हते. मला मधूनच जाग येत होती. तेव्हा माझा नामजप चालू होता.
६. गुरुदेवांच्या कृपेने शस्त्रकर्म झाल्यावर घरी विश्रांती घेणे, आधुनिक वैद्यांनी ‘कर्करोग आहे’, असे सांगितल्यावरही भीती न वाटणे
घरी विश्रांती घेत असतांना मी साधकांना विचारले की, घरी बसून काही सेवा आहे का ? तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘सध्या विश्रांती घ्या आणि नामजप करा.’’ तेव्हा ‘देवाला किती काळजी आहे !’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. त्यानंतर १० दिवसांनी शस्त्रकर्म केल्याचा वैद्यकीय अहवाल आला. तेव्हा मी गुरुदेवांना मानसरित्या सांगितले की, आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून तुम्हीच हा वैद्यकीय अहवाल मला सांगा. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या छातीतील गाठ आपण काढली आहे. आता तशी काही अडचण नाही. तुम्हाला कर्करोग आहे.’’ त्या वेळीही मनामध्ये ना भय होते, ना भीती !
७. कृतज्ञता
‘गुरुदेवा, तुम्ही माझ्या जीवनात किती पालट केला आहे, हे मी सांगू शकत नाही. मी साधना करत नसतो, तर या कर्करोगाला तोंड देऊ शकलो नसतो. देवा, मी सेवा करत नाही, केवळ प्रयत्न करतो. या प्रयत्नांनीही माझे जीवन पालटले. देवा, हे तुम्हीच करू शकता. एके काळी माझाच परिवार माझ्याकडे तिरस्काराने बघायचा. आता परिवारही तुमच्यासारखाच जीव लावतो. ‘गुरुमाऊली, किती हो तुमचा महिमा ! तुम्हीच माझ्याकडून नामजप करून घेतलात. माझी काळजी घेतलीत. देवा, आता माझी प्रकृती चांगली आहे. आपल्या कृपेमुळे मला पुष्कळ बळ मिळाले. देवा, आपल्या चरणी भावपूर्ण वंदन करतो. देवा, धन्य धन्य झाले माझे जीवन. आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. भिकन भागवत मराठे (वय ४५ वर्षे), जळगाव. (२४.२.२०२३)