‘यजमानांचे निधन होणार’, हे लक्षात येऊनही त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर शांत अन् स्थिर रहाणार्‍या राख (तालुका पुरंदर, जिल्‍हा पुणे) येथील श्रीमती नर्मदा वसंत गायकवाड (वय ६८ वर्षे) !

‘२.९.२०२३ या दिवशी राख (तालुका पुरंदर, जिल्‍हा पुणे) येथील कै. वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि नंतर त्यांची पत्नी श्रीमती नर्मदा वसंत गायकवाड (वय ६८ वर्षे) यांच्याविषयी त्यांची लहान मुलगी सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

श्रीमती नर्मदा गायकवाड

१. आजारपणामुळे आई सर्वस्वी वडिलांवर अवलंबून असणे; परंतु वडिलांचे आजारपण अन् निधन या काळात ती स्थिर असणे

‘माझ्या वडिलांच्या दम्याच्या त्रासाची तीव्रता वाढली आणि त्यानंतर १५ ते २० दिवसांत त्यांचे निधन झाले. साधारण १३ वर्षांपासूनआईला संधिवाताच्या तीव्र त्रासामुळे चालता येत नसल्याने ती अंथरुणाला खिळून आहे. वडील आईची सर्व सेवा करत असत. त्यामुळे ती वडिलांवर अवलंबून होती. असे असूनही वडिलांचे आजारपण आणि निधन या काळात ती स्थिर होती.

सौ. लक्ष्मी पाटील

२. वडील रुग्णालयात असतांना आईचीही स्थिती नाजूक असल्याने कुटुंबियांनी वडिलांच्या आजारपणाविषयी तिला अधिक काही न सांगणे

वडील १५ दिवस रुग्णालयात होते. त्यांची स्थिती नाजूक होती. या कालावधीत आईसुद्धा पुष्कळ आजारी होती. तिलाही १५ ते २० दिवस जेवण जात नव्हते. तिचे दिवसभरात केवळ २ ते ४ चमचे एवढेच जेवण असायचे. तिला झोपही लागत नव्हती. तिची स्थिती नाजूक असल्याने आम्ही कुटुंबीय वडिलांच्या आजारपणाविषयी तिला अधिक काही सांगत नव्हतो.

३. आईला सतत वडिलांची सवय असूनही तिने एकदाही ‘त्यांची आठवण येते किंवा भेटायचे आहे’, असे न सांगणे

या कालावधीत आम्ही तिला वडिलांविषयी फार काही सांगत नसलो, तरी तिला वडिलांची स्थिती लक्षात येत होती, तरीही ती स्थिर होती. ती एकदाही रडली नाही. आईच्या आजारपणामुळे वडील तिला सोडून कधी कुठे रहात नव्हते. आईला सतत वडिलांच्या सहवासाची सवय असून तिने एकदाही ‘मला त्यांची आठवण येते किंवा त्यांना भेटायचे आहे’, असे म्हटले नाही.

४. वडील रुग्णालयात असतांना आईला त्यांची आठवण न येणे आणि ‘आईच्या साधनेमुळे देवाने तिला स्थिर ठेवले आहे’, असे वाटणे

वडील रुग्णालयात असतांना आईसुद्धा आजारी असल्याने आम्ही तिला मोठ्या बहिणीच्या (सौ. धनश्री शिंदे यांच्या) घरी भोर येथे काही दिवसांसाठी घेऊन गेलो होतो. त्यानंतर वडिलांची स्थिती आणखीनच नाजूक झाली होती. आईला रात्री आणि दिवसा झोप लागत नव्हती. जेवण जात नव्हते, तरी ती पुष्कळ शांत असायची. मी आईला विचारले, ‘‘आई, तुला अप्पांची (वडिलांची) आठवण येते का ? ‘त्यांना भेटावे’, असे तुला वाटत आहे का ?’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘मला त्यांची आठवण येत नाही आणि त्यांना भेटावे’, असेही मला वाटत नाही. माझ्या मनात त्यांचा विचारही येत नाही. ‘मला त्यांचा विसरच पडला आहे’, असे मला वाटते. माझ्या मनात त्यांच्याविषयी काळजीचेही विचार येत नाहीत.’’ तेव्हा ‘आईच्या साधनेमुळे देवाने तिला स्थिर ठेवले आहे’, असे मला वाटले.

५. ‘वडिलांची प्रकृती पुष्कळ खालावल्याने त्यांना रुग्णालयातून घरी आणण्याचे ठरणे, तेव्हा आईला परिस्थितीला सामोरे जाता येईल का ?’, असे सर्वांना वाटणे; परंतु त्या वेळीही आई स्थिर असणे

वडिलांची स्थिती पुष्कळ नाजूक झाल्याने त्यांना घरी आणण्याचे ठरले. आईलाही भोर येथून तिच्या रहात्या घरी राख (जिल्हा पुणे ) येथे घेऊन जाण्याचे ठरले. आईला घरी जाण्यासाठी विचारल्यावर ती लगेच ‘हो’ म्हणाली. ‘आपण घरी कशासाठी जाणार आहोत’, हे आईला सांगितले, तर ‘तिला परिस्थितीला सामोरे जाता येईल का ?’, असे आम्हा कुटुंबियांना वाटत होते. त्या आधीच आई म्हणाली, ‘‘ह्यांना (यजमानांना) डॉक्टरांनी (आधुनिक वैद्यांनी) घरी न्यायला सांगितले असेल; म्हणून आपण घरी जाणार आहोत’, असे मला वाटते.’’ त्या वेळीही ती स्थिर होती.

६. वडिलांना रुग्णालयातून घरी आणल्यावर त्यांनी आईला नमस्कार करणे, तेव्हा ते आईमधील देवालाच नमस्कार करत असल्याचे कुटुंबियांना जाणवणे 

आईला घरी नेल्यानंतर २ घंट्यांनी वडिलांना घरी आणले. ‘त्यांच्या नाकात नळ्या आणि तोंडाला ‘ऑक्सिजन’ लावलेले होते. लघवीची पिशवी लावलेली होती’, अशा स्थितीत त्यांना ‘स्ट्रेचर’ (रुग्णांना उचलून नेण्यासाठी वापरण्यात येणारे साधन) वरून घरात आणले. घरात आल्या आल्या वडिलांनी दोन्ही हात जोडून आईला नमस्कार केला. आईनेही हात जोडले. या प्रसंगात दोघेही स्थिर होते. वडिलांना सतत आईची काळजी असायची. आईला नमस्कार करतांना त्यांच्या चेहर्‍यावर कसलीही काळजी नव्हती कि डोळ्यांत पाणी नव्हते. ते आईमधील देवालाच नमस्कार करून ‘आता माझी सेवा झाली’, असे सांगत असल्याचे कुटुंबियांना जाणवले.

७. वडिलांच्या निधनाच्या वेळी देवाची कृपा आणि आईची साधना यांमुळे ती स्थिर असणे

‘आईला त्रास व्हायला नको’; म्हणून मी आईला विचारले, ‘‘तुझी दुसर्‍या खोलीत व्यवस्था करूया का ?’’ तेव्हा तिने नकार दिला. एक दिवस आणि एक रात्र वडील आईच्या खोलीत होते. तिच्या समोरच वडिलांना नाकावाटे नळीतून जेवण, पाणी, औषध देणे; अंग पुसणे इत्यादी सेवा करत होतो; परंतु आई स्थिर होती. या कालावधीत आईला झोप नव्हती. पहाटे ४.४५ वाजता वडिलांचे निधन झाले. तेव्हाही आईची स्थिरता न्यून झाली नाही. आम्हाला आईची काळजी वाटत होती. देवाची कृपा आणि आईची साधना यांमुळे ती स्थिर होती. अंत्यविधीसाठी आलेले काही नातेवाईक आईजवळ येऊन रडत होते. तेव्हा ‘आईही काही प्रसंगांत रडत असली, तरी त्यात ती स्थिर आहे’, असे कुटुंबियांना जाणवत होते. या स्थितीतही आई मला नातेवाइकांच्या संदर्भात करावयाच्या काही गोष्टी सुचवत होती.

८. आईला मिळालेली पूर्वसूचना

काही वाईट प्रसंग घडणार असल्यास आधीपासूनच आईला ते जाणवायचे. वडिलांच्या निधनानंतर एकदा आईने सांगितले, ‘‘एका मासात आम्हा दोघांपैकी एकजण तरी जाणार’, असे मला जाणवत होते’’ आणि तसेच झाले.

९. आईला ‘वडिलांच्या आधी स्वतःचे निधन व्हावे’, असे वाटणे आणि जन्म, मृत्यू अन् विवाह आपल्या हातात नसल्याचे तिला समजावल्यावर आईने पुन्हा कधी हा विचार व्यक्त न करणे 

आई म्हणाली, ‘‘मी पुष्कळ वर्षांपासून झोपून आहे. मी देवाला सांगायचे, ‘देवा माझे आयुष्य यांना (वडिलांना) दे’; पण तसे झाले नाही. यांची प्रकृती चांगली असतांना ते अकस्मात् आजारी पडले आणि माझ्या आधीच गेले. मला सुवासिनी जाण्याची पुष्कळ इच्छा होती.’’ हा विचार ती सतत करायची. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘आपण कधी जाणार, हे आपल्या हातात नसून देवाच्या हातात आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह आपल्या हातात नाही. त्यामुळे ‘मला मृत्यू कधी यायला हवा’, याचा विचार करायचा नाही. त्याऐवजी तू देवाला प्रारब्ध सहन करण्यासाठी शक्ती माग.’’ त्यानंतर आईने हा विचार व्यक्त केला नाही.

१०. स्वतःचे आजारपण, पतीचे निधन, नातेवाइकांचे कटू अनुभव यांना सामोरे जातांनाही आई स्थिर असणे

आईला वडिलांचे आजारपण, अंत्यविधी आणि नातेवाइकांच्या संदर्भातील अनेक कटू अनुभव यांना क्षणोक्षणी सामोरे जावे लागत होते. प्रत्यक्षात आईला आधाराची पुष्कळ आवश्यकता असूनही आई पुष्कळ स्थिर होती.

‘केवळ परमदयाळू गुरुमाऊलींच्या कृपेने आम्हाला या कठीण प्रसंगात देवाची कृपा अनुभवता आली. त्यांच्या कृपेमुळेच आई आणि आम्हा बहिणींना स्थिर राहता आले’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. लक्ष्मी पाटील (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक