कर्जत (जिल्हा रायगड) येथील सौ. मंगल अरुण शिंदोळकर (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१. साधनेत येण्यापूर्वी आणि सनातन संस्थेशी परिचय 

सौ. मंगल शिंदोळकर

‘मला साधनेत येऊन साधारण २२ वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी मी कर्मकांडानुसार साधना करत होते, उदा. उपवास, पूजा-अर्चना इत्यादी. काही कालावधीसाठी एका संतांच्या सत्संगाला जात होते. काही दिवसांनी आमच्या निवासस्थानी सनातनचे संस्थेचे काही साधक आले. त्यांनी तेथे प्रवचनाचे आयोजन केले होते. त्या प्रवचनात कुलदेवता आणि श्री दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व सांगण्यात आले. त्या सत्संगातून ‘साधना आणि नामजप केल्याने आपल्याला साधनेच्या स्तरावर कसा अन् किती लाभ होतो ?’, हे मला समजले. त्या दिवसापासूनच खर्‍या अर्थाने मी सनातन संस्थेशी जोडले गेले आणि माझा साधनाप्रवास चालू झाला.

२. साधनाप्रवास

२ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे स्वभावदोषांचे प्रमाण उणावणे

साधनेत आल्यावर आरंभी मी प्रासंगिक सेवा आणि नामजप करत असे. यातून मला पुष्कळ आनंद मिळत होता. प्रारंभी माझ्यामध्ये भीती वाटणे, काळजी करणे आणि ताण येणे इत्यादी स्वभावदोषांचे प्रमाण अधिक होते. साधनेत पुढच्या टप्प्याला गेले, तसे स्वभावदोषांचे प्रमाण उणावत गेले. गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे मला माझ्या स्वभावदोषांवर पुष्कळ प्रमाणात मात करता येऊ लागली. या सर्व गोष्टींमधून मला एक वेगळ्या प्रकारची सात्त्विक ऊर्जा मिळू लागली.

२ आ. साधनेमुळे जीवनातील कठीण प्रसंगांवर मात करता येणे

२ आ १. मोठ्या मुलीच्या यजमानांचे निधन झाल्यानंतर त्यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी तारून नेणे : साधनेमुळे माझ्या जीवनात आलेल्या कठीण प्रसंगांवर मला मात करता आली. वर्ष २०१३ मध्ये माझी मोठी मुलगी कु. शामल हिचा विवाह झाला. त्यानंतर अवघ्या दीड वर्षातच तिच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आमच्या आयुष्यातील हा प्रसंग अतिशय वाईट होता. शामल सुद्धा पूर्णतः खचून गेली होती. हे वर्ष आमच्यासाठी पुष्कळ दुःख आणि ताण-तणाव यांत गेले. या वेळी श्री गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) आम्ही स्थिर होतो. गुरुदेव पाठीशी असल्यामुळे आणि त्याला नामजपाची जोड दिल्याने या प्रसंगातूनही गुरुदेवांनी आम्हाला तारून नेले.

२ आ २. साधनेमुळे धाकटी मुलगी दुर्धर व्याधीतून बरी होणे : माझी धाकटी मुलगी कु. कोमलचा साखरपुडा वर्ष २०१७ मध्ये झाला. त्यानंतर अवघ्या २ मासांतच तिला क्षयरोग (टी.बी.) झाला. ती जवळजवळ १० दिवस अतिदक्षता विभागात होती. त्या वेळी मी गुरुदेवांचा धावा केला. सनातन आश्रमातून सांगितलेले नामजपादी उपाय आणि सेवाकेंद्रातील साधकांनी केलेला नामजप यांमुळे कु. कोमल या आजारातून लवकर बाहेर पडली. तेव्हा ‘गुरुमाऊलीच तिला या व्याधीतून बाहेत काढणार आहेत’, असा मी भाव ठेवला होता. त्यानंतर गुरुमाऊलींच्याच कृपेने कु. कोमल हिचा विवाह झाला. तिला ३ वर्षांची मुलगी आहे. ‘गुरुदेवांचा वरदहस्त असल्यामुळेच माझ्या दोन्ही मुलींच्या जन्माचे प्रारब्ध संपले’, असे मला वाटते.

२ इ. दायित्व घेऊन सेवा करू लागणे

साधनेत आल्यावर प्रारंभी मी दायित्व घेऊन सेवा करण्याचे टाळत होते. भीडस्तपणा, नेतृत्वगुणाचा अभाव आणि प्रतिमा जपणे इत्यादी स्वभावदोष माझ्या साधनेत अडथळे आणत होते. गेल्या वर्षभरात गुरुमाऊलींनी ‘समष्टीसाठी काय आवश्यक आहे ?’, याची मला जाणीव करून दिली. ‘साधनेत पुढे जायचे असेल, तर दायित्व घेऊन सेवा आणि झोकून देऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे’, असे देव सुचवत होता. त्यामुळे कर्जतला गुरुपौर्णिमेच्या प्रसाराचे दायित्व घेऊन मी सेवा केली. त्यामुळे समष्टी सेवेतील आनंद मला अनुभवता आला. हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि अन्य सेवा यांसाठी अन्य ठिकाणी समष्टी सेवा करण्यासाठी मी जाऊ लागले. गुरुपौर्णिमेपासून मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची इच्छा होती. आता शिबिराच्या सेवेसाठी उत्तरदायी साधकांनी रामनाथी आश्रमात जाण्यासाठी मला विचारले. तेव्हा ‘देव योग्य वेळी इच्छा पूर्ण करतो’, हे माझ्या लक्षात आले.’

– सौ. मंगल अरुण शिंदोळकर (वय ६२ वर्षे), कर्जत, रायगड. (१४.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक