‘जेवणानंतर थेट अंथरुणावर पडू नये थोडे का होईना; पण चालावे’, हा सल्ला अनेक आरोग्यतज्ञ देतात. ‘जेवल्यावर शतपावली करावी’, हा सल्ला आपणही ऐकून असाल; पण ‘अती तिथे माती’, हा नियम या सल्ल्यालासुद्धा लागू होतो. ‘अर्ली फूड्स’च्या संस्थापिका शालिनी संतोष कुमार यांनी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील लिखाणामध्ये म्हटले आहे की, मला अजूनही आठवते की, मी दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर माझ्या कार्यालयात किंवा घरी असतांनाही ३० मिनिटे चालायचे. हे केवळ थकवणारेच नव्हते, तर आता माझ्या लक्षात आले आहे की, अन्नही नीट पचले नाही; कारण सर्व रक्तप्रवाह आणि ऊर्जा पोटावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पाय अन् हात यांना दिली जाते.
जेवणानंतर १०० पावले चालणे पचनासाठी पुरेसे !
शालिनी यांनी या अनुभवाविषयी आयुर्वेददृष्ट्या सविस्तर माहिती मिळवली असून त्याविषयीची माहितीही त्यांनी या लिखाणात दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘साधे वज्रासन किंवा १०० पावले चालणे पचनासाठी पुरेसे आहे. काही जण कधी कधी तासभर चालतात; पण हा केवळ जागरूकतेचा अभाव आहे. अगदी लहान मुलांनाही जेवणानंतर खेळायला किंवा जास्त उड्या मारायला देऊ नका. त्यांना वाटल्यास बैठे खेळ खेळायला द्या, लिहायला किंवा वाचायला द्या, अगदी सोप्या आणि साध्या हालचाली करणे पुरेसे ठरेल.’
जेवल्यानंतर १०० पावलेच का चालावे ?
शिल्लिम (जिल्हा पुणे) येथील ‘धारणा’ संस्थेचे आरोग्य संचालक डॉ. अरुण पिल्लई यांनी सांगितले, ‘चरक संहिता’ सूत्रानुसार जेवणानंतर ‘शतपावली’, म्हणजेच १०० (शत) पावले (पावली) चालण्याची शिफारस केली जाते. पाश्चात्त्य जगातही ‘थर्मल वॉक’ म्हणून ही पद्धत प्रचलित आहे. आयुर्वेदात १०० हा क्रमांक महत्त्वाचा आहे; कारण मानवी वय नेहमीच शतायु (१०० वर्षे) म्हणून मोजले जात होते. अन्नाच्या चयापचयासाठी जठराग्नीला सक्रीय करण्यासाठी १०० पावले चालणे आवश्यक आहे. जेवणानंतर थोडे चालल्याने पचन आणि मूड सुधारण्यास साहाय्य होते. सूज येणे, जठराची सूज आणि ‘ग्लुकोज’ची (साखरेची) पातळी न्यून होते, तसेच अन्नातील पोषणही शरिरात चांगल्या पद्धतीने शोषण्यास साहाय्य होते.’
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ)