‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी काही कारणाने बाहेरगावी गेले होते, तरीही मला त्यांचा ब्रह्मोत्सव ‘ऑनलाईन’, विनाअडथळा आणि निर्विघ्नपणे पहाता आला. गुरुदेवा, तुमच्या या प्रीतीसाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. कार्यक्रम अतिशय भावजागृती करणारा झाला. गुरुदेवा, ‘माझी काहीच पात्रता नसतांना आपण माझ्यावर ही कृपा केली’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘तिन्ही गुरूंना होणार्या त्रासाच्या निवारणार्थ आणि ब्रह्मोत्सवाचा सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा’, यासाठी नामजप शोधणे आणि संतांनी ते करणे
प्रत्येक गुरुवारी होणार्या भक्तीसत्संगाच्या प्रक्षेपणातही बर्याचदा तांत्रिक अडचणी येतात; मात्र या ब्रह्मोत्सवाच्या ‘ऑनलाईन’ प्रक्षेपणात एकही अडथळा आला नाही’, याचे मला आश्चर्य वाटले. नंतर मला समजले, ‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘तिन्ही गुरूंना होणार्या त्रासाच्या निवारणार्थ, ब्रह्मोत्सवात कुठलाही अडथळा येऊ नये आणि तेथील चैतन्याचा सर्वत्रच्या साधकांना पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर लाभ घेता यावा’, यासाठी विविध नामजप शोधले. अनेक संतांनी ते नामजप भावपूर्णपणे केले.’ नामजपादी उपायांचे केलेले हे नियोजन पाहून मला तिन्ही गुरु आणि संत यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांनाही मला प्रत्यक्ष कार्यक्रम पहात असल्याएवढेच चैतन्य अनुभवता आले. अवर्णनीय रथोत्सव पहातांना माझी भावजागृती झाली.
२. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने अनेक वर्षे दायित्वाने गुरुसेवा करणार्या साधकांचे कौतुक करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेवांनी उपस्थितांना अनेक वर्षे दायित्वाने गुरुसेवा करणार्या साधकांचा परिचय करून दिला. खरेतर, सामान्य व्यक्तीच्या वाढदिवसादिवशी त्या व्यक्तीचे महत्त्व असते. तिचाच गौरव केला जातो; परंतु श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांनी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुरुसेवा करणार्या साधकांना व्यासपिठावर बोलावून ते अनेक वर्षे करत असलेल्या सेवेचे कौतुक केले. मला सामान्य व्यक्ती आणि परमेश्वर यांतील हा मुख्य भेद जाणवला. साधक सेवा करत असले, तरी त्यांना प्रेरणा आणि शक्ती देणारे आपणच आहात गुरुदेव ! जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात आपल्या साधकशिष्यांचे कौतुक करणार्या महान गुरुदेवांकडून ‘स्व’ विसरून नेहमी इतरांना महत्त्व आणि श्रेय द्यायला हवे. अकर्तेपण मनी असायला हवे’, हे मला शिकता आले.
३. ब्रह्मोत्सवाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे
ब्रह्मोत्सवात काही संत आणि समाजातील प्रतिष्ठित हितचिंतक यांना व्यासपिठावर बोलावले होते. त्यांचे बोलणे ऐकतांना मला पुष्कळ सूत्रे शिकता आली.
३ अ. संतांकडून शिकता आलेली सूत्रे
३ अ १. धनबाद येथील सनातनचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका आणि सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता खेमका
अ. पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या बोलण्यातून ‘त्यांचे गुरुदेवांशी अखंड अनुसंधान असते’, हे लक्षात आले. तेव्हा ‘मी सेवा आणि ‘स्व’विचार यांत किती अडकते’, याची मला जाणीव झाली.
आ. पू. खेमकाकाकांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यवसायाचा व्याप मोठा असूनही ‘त्यांच्या मनात त्याविषयी कुठलेही विचार नसतात. त्यांनी सर्वकाही ईश्वरचरणी अर्पण केले आहे’, हे लक्षात येऊन मला माझ्यामधील कर्तेपणाची जाणीव झाली.
३ अ २. देहली येथील सनातनचे ११५ वे (समष्टी) संत पू. संजीव कुमार
अ. पू. संजीव कुमार म्हणाले, ‘‘साधकांमुळेच मी घडलो आहे; म्हणून मला साधकांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.’’ हे ऐकल्यावर ‘मलाही साधकांविषयी कृतज्ञताभावात रहायला हवे’, हे शिकता आले.
आ. त्यांच्या वाहनचालकाचे नाव ‘महादेव’ आहे. वाहनचालकाचे नाव ऐकल्यावर त्यांना ‘साक्षात् भगवान शंकरच आपल्याला न्यायला आले आहेत’, या भावाने कृतज्ञता वाटली. ते ऐकून ‘त्यांच्याप्रमाणे साधकांमधील परमेश्वराचे रूप अनुभवायचे आहे’, याची मला जाणीव झाली.
३ इ. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मनोगतातून शिकता आलेली सूत्रे
३ इ १. पितांबरी आस्थापनाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई, ठाणे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
अ. श्री. प्रभुदेसाई यांची गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांनी गुरुदेवांच्या शिकवणुकीनुसार व्यवसाय करत आरंभी २ – ३ असणारी उत्पादने वाढवत नेली. सध्या त्यांच्या आस्थापनात एकूण १२७ प्रकारची उत्पादने बनत आहेत. यावरून ‘गुरुदेवांची शिकवण किती महान आहे ! ती समजून घेऊन आचरणात आणली, तर सगळीकडे विजयच आहे’, हे माझ्या लक्षात आले.
३ इ २. अधिवक्ता कृष्णमूर्ती (मडिकेरी, कर्नाटक)(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
अ. अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्या अनुभूतींतून ‘गुरुदेवच हिंदु राष्ट्रासाठी निष्कामभावाने कार्य करणार्या भारतभरातील कार्यकर्त्यांचा योगक्षेम वहातात आणि त्यांना धर्मरक्षणासाठी बळ देऊन प्रसंगी त्यांचे रक्षण करतात’, हे लक्षात आले. ते प्रत्यक्ष ऐकतांना माझी भावजागृती झाली.
४. स्वतःला होणार्या त्रासाचा विचार न करता साधकांवर सतत कृपावर्षाव करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
ब्रह्मोत्सवाच्या ठिकाणी ‘दैवी (सूक्ष्म) स्तरावर अजून काय-काय घडले ?’, ते समजून घेण्यास आम्ही असमर्थ आहोत. गुरुदेवा, वय अधिक असतांना, अनिष्ट शक्तींची सतत होणारी आक्रमणे झेलत, प्रचंड उकाड्यात, साधकांच्या आनंदासाठी सर्व आभूषणे घालून अनेक घंटे एकाच स्थितीत केवळ आपणच बसू शकता ! तुमच्यावाचून आम्हा पामरांसाठी इतके कोण करणार ? गुरुदेवा, ‘आपण साक्षात् परमेश्वर असून आपली कृपादृष्टी सतत आमच्यावर आहे’, याची जाणीव आम्हाला सतत असू दे. आपणच आम्हाला आपल्या चरणी लीन करवून घ्या.
५. कृतज्ञता
द्वापरयुगात महाभारतीय युद्धाच्या वेळी रथात केवळ अर्जुनाला विश्वरूपदर्शन घडले; परंतु ‘या घोर कलियुगात सर्व साधकांसाठी तुम्ही अनेक घंटे रथारूढ होऊन साधकांना दर्शन देऊन ऊर्जा प्रदान केली. ‘आपण साधकांवर जी कृपा केली’, त्यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– कु. गीतांजली काणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |