Gujarat High Court : या कृतीसाठी आपल्याला देवही क्षमा करणार नाही ! – गुजरात उच्च न्यायालय

  • हत्या केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर टाकल्याचे प्रकरण

  • जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचा आदेश

कर्णावती (गुजरात) – लोकांच्या सोयीसाठी मुक्या प्राण्यांचा बळी दिला जाऊ शकत नाही. या कृतीसाठी आपल्याला देवही क्षमा करणार नाही. हे प्रकरण अतिशय अस्वस्थ करणारे आहे, अशी टिपणी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील गोहत्येविषयीच्या एका प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी केली. गुजरातच्या नडियाद जिल्ह्यात झालेल्या ३० गायींच्या हत्येविषयी ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. येथे हत्या केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर दिसून आले. त्याची छायाचित्रेही प्रसारित झाली. या प्रकरणात नडियादचे रहिवासी मौलिक श्रीमाली यांनी अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने हे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

भटक्या जनावरांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने पांजरपोळात गायी ठेवल्या होत्या. त्यांतील ३० गायींची हत्या झाली. एका खुल्या जागेत हत्या केलेल्या गायींचे सांगाडे फेकण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

काही राज्यांमध्ये गोहत्या बंदी असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडतात, हे तेथील सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे. संबंधितांना यासाठी उत्तरदायी ठरवून शिक्षा करण्याची आवश्यकता आहे, तरच याविषयी गांभीर्य निर्माण होईल !