काय आहेत कापराचे लाभ ?

कापूर बर्‍याचदा पूजा किंवा हवन करतांना वापरला जातो; मात्र एक चिमूटभर कापूर आपल्यासाठी पुष्कळ लाभदायी आहे. कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, त्याविषयी आपल्याला माहिती नसते. कापूर हा ‘अँटी-बॅक्टेरियल’ (जीवाणूरोधक) गुणधर्मांनी समृद्ध आहे. नैसर्गिक कापूर शरिराच्या अनेक समस्या दूर करू शकतो. असा हा कापूर कोणत्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, याची माहिती या लेखात देत आहोत.

कापूर

१. सर्दी-खोकल्यामध्ये लाभदायक

सर्दी आणि खोकला झाला असल्यास कापूर पुष्कळ लाभदायी आहे. सर्दी किंवा खोकला असल्यास कोमट मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज करावा. कापूर गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने बंद झालेले नाक उघडते आणि सर्दीपासून आराम मिळतो.

२. दुखण्यापासून आराम

पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या असल्यास तेलात कापूर मिसळून मालीश केल्यामुळे आराम मिळतो. थकवा जाणवत असल्यास तीळ किंवा मोहरी यांच्या तेलात कापूर मिसळून मालीश करावे.

३. आरोग्यदायी केसांसाठी उपयुक्त

कापूर हा केसातील कोंडा, कोरडेपणा, केस गळणे यांसारख्या समस्या दूर करतो. कापूर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि केस चमकदार होतात. जर दाट आणि लांब केस हवे असतील, तर खोबरेल तेलात कापूर मिसळून लावल्याने लाभ होतो.

४. त्वचेसाठी लाभदायी

कापरामध्ये जीवाणूरोधक गुणधर्म असतात. कापूर वापरल्याने मुरूम दूर होतात. हे ‘बॅक्टेरिया’ला (जिवाणूला) दूर ठेवते, म्हणजे मुरूम विकसित होत नाहीत.

५. डाग होतात दूर !

जर कुणाच्या तोंडावर पिंपल-नखांचा डाग असेल, तर तो कापूर लावून काढता येतो. नारळाच्या तेलात कापूर मिसळून तोंडावर लावावे. त्यामुळे डाग दूर होतात आणि त्वचा चांगली होते.

६. डोकेदुखीपासून आराम

कापूर पुष्कळ थंडावा देतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अर्जुन वनस्पतीची साल, पांढरे चंदन आणि सुंठ यांमध्ये कापूर मिसळून डोक्याला लावल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो.

(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र’)

कापरापासून विविध लाभ जरी होत असले, तरी प्रकृतीनुरूप वैद्यांना विचारूनच त्याचा उपयोग करावा. – संपादक