कोल्हापूर येथे अयोध्येतील ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन !

कोल्हापूर येथे ठेवण्यात आलेले मंगल अक्षता कलश

कोल्हापूर – अयोध्येहून प्रभु श्री रामचंद्र यांच्या मूर्तीला चरणस्पर्श करून ‘रामलला प्रतिष्ठान’कडून आलेला पवित्र मंगल अक्षता कलशाचे १० डिसेंबरला कोल्हापूर येथे वेदमूर्ती सुहास जोशी यांच्या पौरोहित्याखाली विश्व हिंदु परिषदेच्या वतीने विधीवत् पूजन झाले. या वेळी सामूहिक आरती, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र यांचे पठण झाले. मोठ्या थाटामाटात प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पार पडत आहे. ज्यांना या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य नाही, त्यांना याचे दर्शन घेता यावे; म्हणून हा मंगल अक्षता कलश कोल्हापूर येथे आणण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा मंगल कलश सर्वांना दर्शनासाठी शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर, शाहूपुरी येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

कोल्हापूर येथे ‘मंगल अक्षता कलशा’चे पूजन करतांना वेदमूर्ती सुहास जोशी आणि मान्यवर

१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोल्हापूर शहरात घरोघरी जाऊन श्रीराममंदिर सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि श्रीराम मंदिराची प्रतिमा यांचे वाटप करण्यात येणार आहे. ‘श्री रामचंद्रांच्या या मंदिर उभारणीमध्ये संपूर्ण राष्ट्राचा सहभाग असावा’, हाच संदेश यामधून देण्यात येणार आहे. या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अनिल दिंडे, जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, उपाध्यक्ष शांतीभाई लिंबानी, अत्री चैतन्य महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध कोल्हापुरे, ‘मातृशक्ती’ संयोजिका अश्विनी ढेरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, गजानन तोडकर, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजय खाडे उपस्थित होते.