‘वर्ष २०१७ मध्ये आम्हा उभयतांना (श्री. अरविंद आणि पत्नी सौ. सुजाता कल्याणकर यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी आम्हाला ‘आई-बाबांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करा’, असे सांगितले होते. त्यानुसार आम्ही ‘संतांची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवून वडिलांची सेवा केली. १२.१०.२०२३ या दिवशी माझे वडील कै. मारुतराव मल्हारी कल्याणकर (भाऊ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ११.१२.२०२३ या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. कष्टमय बालपण
भाऊंचे शिक्षण ७ वी पर्यंत झाले होते. ते लहान असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी कौटुंबिक दायित्व घेऊन त्यांचे कर्तव्य पूर्ण केले.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. वक्तशीरपणा : भाऊंचा दिनक्रम नियोजित होता. त्यानुसार ते काटेकोरपणे वेळेचे पालन करायचे. भाऊ गिर्हाईकांचे कपडेही त्यांना दिलेल्या वेळेच्या आधीच शिवून ठेवायचे.
२ आ. नीटनेटकेपणा : भाऊंचे कपडे नेहमी पांढरे, स्वच्छ धुतलेले आणि इस्त्री केलेले असायचे.
२ इ. कर्तव्ये पूर्ण करणे
१. भाऊंना २ मोठे भाऊ असूनही भाऊंनी शिवणकाम करून त्यांच्यापेक्षा लहान भाऊ आणि २ बहिणी यांचे शिक्षण पूर्ण केले अन् त्यांचे विवाह करून दिले.
२. त्यांनी आम्हा चारही भावंडांना उत्तम शिक्षण दिले आणि त्यांच्या कृतीतून घडवले.
२ ई. काटकसरीपणा आणि प्रामाणिकपणा : भाऊ गिर्हाइकांकडून आवश्यक तेवढेच कापड घेऊन त्यांचे कपडे शिवून देत. कधी अतिरिक्त कापड शेष राहिल्यास भाऊ त्याला ते आठवणीने परत देत असत.
२ उ. निरपेक्ष वृत्ती : अनेक गिर्हाइकांनी त्यांचे पैसे बुडवले, तरी भाऊ सर्वांप्रमाणे त्यांचेही कपडे अगदी व्यवस्थित आणि वेळेत शिवून देत. कुणी कसेही वागले, तरी भाऊ त्यांची कर्तव्ये पूर्ण करायचे.
२ ऊ. कर्मयोगी : भाऊंची काम करण्यावर पुष्कळ श्रद्धा होती. ते म्हणायचे, ‘कामातच देव आहे.’ त्यांनी कधीही अनावश्यक सुटी किंवा सवलत घेतली नाही. भाऊंसाठी ‘काम चोख करणे’, म्हणजेच पूजा करण्यासारखे होते. त्यांच्यामध्ये सातत्य, स्वाभिमान, चिकाटी आणि जिद्द हे गुण दिसून यायचे.
२ ए. वृत्तपत्र वाचनाची आवड असणे : भाऊंना वृत्तपत्र वाचायला आवडायचे. ते नियमितपणे दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायचे. त्यातील महत्त्वपूर्ण सूत्रे ते आम्हाला आवर्जून सांगायचे.
२ ऐ. सेवाभाव : वर्ष २०१८ नंतर भाऊंनी दुकानात जायचे थांबवले. ते घरात राहून सनातनच्या साधकांची सेवेच्या संदर्भातील पाकिटे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके किंवा निरोप यांची देवाण-घेवाण करायची सेवा अगदी चोख करायचे.
३. भाऊंच्या निधनापूर्वी मिळालेली पूर्वसूचना !
भाऊंच्या निधनाच्या आदल्या दिवशी ते माझी पत्नी सौ. सुजाता हिला म्हणाले, ‘‘माझ्याकडे केवळ एक घंटा शिल्लक आहे.’’ तेव्हा आम्हाला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ समजला नाही; परंतु रात्री झोपी गेलेले भाऊ दुसर्या दिवशी जागे झालेच नाहीत ! तेव्हा लक्षात आले, ‘त्यांच्याकडून आम्हाला ही पूर्वसूचनाच मिळाली होती.’
४. भाऊंच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
अ. भाऊ झोपेत असतांना काहीही त्रास न होता अगदी शांतपणे त्यांचे निधन झाले.
आ. भाऊंच्या निधनानंतर साधारण १२ – १३ घंट्यांनी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले, तरीही त्यांचा तोंडवळा सतेज दिसत होता.
इ. ‘ते शांत झोपले आहेत’, असे जाणवून ‘त्यांच्याकडे पहात रहावे’, असे वाटत होते.
ई. ‘त्यांच्या देहातून खोलीत पांढरा प्रकाश पसरत आहे’, असे मला जाणवले.
उ. भाऊंच्या निधनानंतरचे पुढील सर्व विधी सहज आणि निर्विघ्नपणे झाले.
ऊ. आम्ही घरात भ्रमणभाषमधील ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर १५ दिवस गुरुदेव दत्तांचा नामजप अखंड लावून ठेवला होता. त्यासह घरातील आम्ही सर्व जण दत्तांचा नामजप करण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा आम्हाला स्थिरता अनुभवता येत होती.
५. प्रार्थना
‘हे गुरुदेवा, भाऊंना सद्गती मिळो’, हीच आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.
६. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपाशीर्वादामुळे मी हे सर्व लिहू शकलो’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– श्री. अरविंद मारुतराव कल्याणकर (मुलगा), बारामती, पुणे. (७.११.२०२३)