सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सनातनच्या साधक कुटुंबाला भेटायला गेल्यावर त्यांना श्री लक्ष्मीमातेने दिलेली दैवी अनुभूती !

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कपाळावर चिकटलेल्या अक्षता बाजूला गोलात मोठ्या करून दाखवल्या आहेत.

१. सौ. राधा योगेश प्रभुदेसाई यांनी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना त्यांच्या घरी दिवाळीच्या फराळासाठी आमंत्रित करणे

‘२४.१०.२०२२ या दिवशी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. आश्रमातील साधिका सौ. राधा योगेश प्रभुदेसाई (वय ४४ वर्षे) यांनी मला त्यांच्या घरी दिवाळीचा फराळ करण्यासाठी आमंत्रित केले होते. मी आणि माझे यजमान श्री. अतुल पवार आम्ही दोघेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रभुदेसाई कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. प्रभुदेसाई कुटुंबातील सर्वजण (प्रभाकर प्रभुदेसाई – वय ८१ वर्षे, सौ. उल्का प्रभाकर प्रभुदेसाई – वय ७३ वर्षे, श्री. योगेश प्रभाकर प्रभुदेसाई – वय ४३ वर्षे, श्रीमती तनुजा प्रभुदेसाई – वय ४७ वर्षे, सौ. राधा यांचे सासरे, सासुबाई, पती आणि नणंद), सौ. राधा आणि आम्ही दोघे असे आमच्यामध्ये साधना अन् अनुभूती यांविषयी बराच वेळ चर्चा झाली. आम्ही एक प्रकारे तो सत्संग सोहळाच अनुभवला. प्रत्येकाचे मन भावाच्या स्थितीने भरलेले होते आणि सर्वांच्या मनात एकमेकांप्रती प्रेमभाव अन् आदरभाव दाटून आला होता.

२. साधिकेच्या घरून निघतांना साधिकेने पू. (सौ.) अश्विनी पवार यांची ओटी भरणे

प्रभुदेसाई यांच्या घरून निघतांना सौ. राधा प्रभुदेसाई हिने माझी ओटी भरली.तिने मला हळद-कुंकू लावून माझ्या कपाळाला अक्षता लावल्या. त्यानंतर तिने माझे औक्षण करून ओटी भरली.

३. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कपाळाला चिकटलेल्या अक्षता सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११.३० वाजेपर्यंत त्याच स्थितीमध्ये असणे

साधारण सायंकाळी ६.४५ ते ७ या वेळेत तिने माझी ओटी भरली. हळदी-कुंकू लावल्यानंतर माझ्या कपाळावर लावलेल्या अक्षता जशाच्या तशा कपाळाला होत्या. ओटी भरून झाल्यानंतर आम्ही दुचाकी वाहनाने आश्रमात आलो. त्यानंतर महाप्रसाद घेणे, सेवा करणे आणि अन्य वैयक्तिक कृती करूनही माझ्या कपाळावरील अक्षता कपाळाला चिकटलेल्या होत्या. मी रात्री ११.३० वाजता झोपण्यापूर्वी साडी पालटून पंजाबी पोशाख घातला आणि झोपायला गेले. झोपेपर्यंत माझ्या कपाळावरील अक्षता चिकटलेल्याच होत्या.

४. ‘साक्षात् श्री लक्ष्मीमातेने दिलेली ही दैवी अनुभूती आहे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

इतर वेळी औक्षण करतांना कपाळाला लावलेल्या अक्षता सहजासहजी कपाळाला चिकटत नाहीत किंवा चिकटल्याच, तर आपली हालचाल झाल्यानंतर त्या कपाळावरून खाली पडतात; परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौ. राधा हिने माझ्या कपाळाला लावलेल्या अक्षता पुढे ५ घंटे (झोपेपर्यंत) कपाळावर टिकून राहिल्या. तेव्हा ‘साक्षात् श्री लक्ष्मीमातेने दिलेली ही दैवी अनुभूती आहे’, असे मला वाटले आणि कृतज्ञता व्यक्त झाली.’

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.१.२०२३)