नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील ड्रग्जविरोधातील पोलीस विभागाची लढाई चालू आहे; मात्र जर ड्रग्जविक्री करणार्या आरोपींसमवेत कुणी हातमिळवणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल, तर कलम ३११ अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ८ डिसेंबर या दिवशी केली. सदस्य अनिकेत तटकरे यांनी या संदर्भातील सूत्र मांडले होते. खोपोली येथे ७० ते ८० किलो एम्डी पावडर जप्त केल्याचा विषय त्यांनी मांडला.
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्ज तस्करीचे जाळे मोडून काढण्याविषयी सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकार्यांना देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अमली पदार्थ सिद्ध करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे धाड टाकण्याची कारवाई चालू आहे. राज्यात पोलीस विभागाच्या वतीने ड्रग्जच्या विरोधात लढाई चालू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते; मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते.