‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री कामाख्यादेवीचा याग झाला. पूर्णाहुतीच्या दिवशी यज्ञकुंडाच्या सभोवती मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्या वेळी मला दिसले, ‘सर्व दिव्यांमधून चैतन्य प्रक्षेपित होऊन ते यज्ञाकडे जात आहे’; परंतु यज्ञकुंडात अग्नी मंद गतीने प्रज्वलित होत होता. एकदा आहुती दिल्यावर धुराचे लोट येत होते. तेव्हा मला जाणवले, ‘बाहेरून अनिष्ट शक्तींचे संघटित आक्रमण होत असल्याने यज्ञकुंडातील ज्वाळा प्रज्वलित होत नव्हत्या. यज्ञ करणारे त्रस्त झाल्यावर त्या अनिष्ट शक्तींना पुष्कळ आनंद होत होता. या अडथळ्यांमुळे यज्ञ पूर्ण व्हायला एरव्हीपेक्षा ३ पट अधिक वेळ लागत होता; परंतु तळमळीने आणि कळकळीने प्रार्थना केल्यामुळे यज्ञ प्रज्वलित होत होता आणि आहुती स्वीकारल्या जात होत्या.’
यागाच्या दुसर्या दिवशी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास मला जाणवले, ‘कालच्या यज्ञात अडथळे आणू शकल्याने अनिष्ट शक्ती आश्रमाजवळील डोंगरावर विजयोत्सव साजरा करत आहेत. त्या विजयाचे झेंडे घेऊन अंगविक्षेप करत नाचत आहेत.’
– श्रीमती वसुधा कालिदास देशपांडे (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |