Putin On PM Modi : पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रहिताच्या निर्णयावरून धमकावले जाऊ शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व भारताचे पंतप्रधान मोदी

नवी देहली – पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रहिताच्या निर्णयावरून धमकावले जाऊ शकत नाही किंवा काहीही करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. ‘पंतप्रधान मोदी हेच रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांचे हमीदार आहेत’, असेही पुतिन या वेळी म्हणाले. ते मॉस्कोमध्ये आयोजित १४ व्या ‘व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम’च्या ‘रशिया कॉलिंग’ या कार्यक्रमात बोलत होते. पुतिन यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.

पुतिन पुढे म्हणाले की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सतत विकसित होत आहेत आणि याची हमी पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे. खरे सांगायचे तर भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याविषयी मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचे मला कधीकधी आश्‍चर्य वाटते.

पुतिन यांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात यापूर्वी केलेली विधाने

१. पाश्‍चात्य देशांनी भारत आणि रशिया यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे निरर्थक आहे; कारण भारत हा एक स्वतंत्र देश असून तो तेथील नागरिकांच्या हितासाठी काम करतो.

२. पाश्‍चात्य देश प्रत्येक देशासाठी शत्रू निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जो त्यांच्या मक्तेदारीशी सहमत नाही; परंतु भारत सरकार आपल्या देशाच्या हितासाठी स्वतंत्रपणे काम करत आहे.

३. पंतप्रधान मोदी हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी आमचे चांगले राजकीय संबंध आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत झपाट्याने विकसित होत आहे. हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.

४. आपण आपला मित्र देश भारताचे अनुसरण केले पाहिजे. ते देशातच वाहने बनवत आणि वापरत आहेत. कोणत्या वर्गातील अधिकारी कोणत्या गाड्या चालवू शकतात ?, हे आपण ठरवले पाहिजे, जेणेकरून ते देशांतर्गत गाड्या वापरतील.

५. भारत असा देश आहे, जो आस्थापनांना त्यांच्या देशात येऊन काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे विशेष मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी ‘मेक इन इंडिया’ योजनेस प्रारंभ केला होता. आज भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.

६. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासात अभूतपूर्व यश मिळवले आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांची ‘मेक इन इंडिया’ची कल्पना अर्थव्यवस्था आणि मूल्ये यांच्या दृष्टीने परिपूर्ण आहे.

७. भविष्य भारताचे आहे; कारणतेथील लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे. ही प्रत्येक भारतियासाठी अभिमानाची गोष्ट आहे.  आपल्या लोकांच्या हिताचे रक्षण कसे करायचे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा लोकांपैकी एक आहेत, जे स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्यात तज्ञ आहेत.