गुरुकृपायोगामध्ये ‘ज्ञानयोग’ हा भक्तीयोगाच्या अंतर्गत येतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झाली. यामध्ये विविध साधनामार्ग, उदा. भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आदी सामावलेले आहेत. त्यामुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती जलद होते.

२. कलियुगामध्ये भक्तीयोगानुसार साधना करून जलद आध्यात्मिक उन्नती करणे शक्य आहे. यासाठी ‘गुरुकृपायोग’ हा भक्तीयोगप्रधान आहे. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकाच्या आवश्यकतेनुसार त्याला अन्य साधनामार्ग शिकवले जातात.

३. गुरुकृपायोगामध्ये ज्ञानयोग स्वतंत्रपणे न शिकवता, तो भक्तीयोगाच्या माध्यमातून शिकवला जातो, हे याचे एक वैशिष्ट्य आहे. भक्तीयोगानुसार उपासना करतांना साधकाला त्यातील केवळ कृती करण्यास न सांगता, ती तशी का करावी ? त्यामागील शास्त्र काय आहे ? यांचे ज्ञानही सांगितले जाते. उदा. भक्तीयोगानुसार ‘विठ्ठलाला बुक्का, तुळशीची माळ आवडते; म्हणून त्याला ती अर्पण करावी’, असे सांगितले जाते, तर गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकाला ‘विठ्ठलाला बुक्का आणि तुळशीची माळ हेच का अर्पण करावे ?’, याचे शास्त्रही सांगितले जाते. थोडक्यात ‘गुरुकृपायोगामध्ये ‘ज्ञानयोग’ हा भक्तीयोगाच्या अंतर्गत येतो.’

४. गुरुकृपायोगामध्ये अन्य साधनामार्ग उदा. कर्मयोग, नामसंकीर्तनयोग, मंत्रयोग यांसारख्या साधनामार्गानुसार साधना करतांना त्यांची माहिती सांगितली जाते, ती केवळ त्या साधनामार्गाचे तत्त्व अथवा विवेचन करण्यापुरती असते, उदा. कर्मफल कसे लागू होते? नाम कोणते आणि कसे घ्यावे ? इत्यादी.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१२.७.२०२३)