चीनने त्याच्या बेपत्ता माजी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांना ठार केले आहे !

ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांचा दावा

चीनचे माजी संरक्षणमंत्री ली शांगफू आणि माजी परराष्ट्रमंत्री किन गँग

बीजिंग (चीन) – चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग आणि माजी संरक्षणमंत्री ली शांगफू हे पदांवर असतांनाच अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. अशा स्थितीत या दोघांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हे दोघे मंत्रीच नाही, तर अनेक उच्चाधिकारीही गायब झाले आहेत आणि त्यांनाही ठार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यामागे असल्याचा दावा केला जात आहे. या सर्वांच्या प्रकरणी चीनकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ब्रिटनचे वर्तमानपत्र ‘द सन’च्या वृत्तानुसार किन गँग, ली शांगफू यांच्यासमवेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन सध्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्वीपेक्षा अधिक कठोर झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये नेमके काय चालू आहे, हे समजणे कठीण झाले आहे. अशा वेळी चिनी अधिकार्‍यांचे अचानक बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. काही जण जिनपिंग यांना रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्याप्रमाणे पहात आहेत. ‘पुतिनही त्यांच्या विरोधकांना ठार मारतात’, असा आरोप केला जातो.

संपादकीय भूमिका

चीनचे क्रौर्य आणि जनतेप्रती असलेला पाशवी व्यवहार जगापासून लपून राहिलेला नाही. अशा चीनपासून भारताने नेहमी सावध रहाणे आवश्यक !