साधनेसाठी आवश्यक अशा व्यष्टी आणि समष्टी गुणांनी युक्त असलेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

दैवी बालकांना घडवणारे धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

असामान्य गुरु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांनी हिंदु राष्ट्रासाठी घडवलेल्या असामान्य दैवी बालकांमधील दैवी गुणसंपन्नतेचे श्रियाच्या रूपातून दर्शन घडते. गुरुदेवांच्या कृपेने अशी असामान्य दैवी बालिका सनातनला मिळाली आहे, त्याबद्दल गुरुदेवांविषयी अपार कृतज्ञता वाटते.
– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१९.४.२०२३)

‘फोंडा, गोवा येथील अवघ्या १२ वर्षांची कु. श्रिया राजंदेकर ही प्रतिदिन २ – ३ घंटे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करण्यासाठी येते. तिच्यामध्ये ‘नम्रता, शिस्त, प्रेमभाव आणि समंजसपणा’ इत्यादी व्यष्टी गुण आहेत, तिचा स्वभाव लाघवी आहे, तसेच तिच्यामध्ये उत्तम समष्टी गुणही आहेत.

कु. श्रिया राजंदेकर

१. उत्तम निरीक्षणक्षमता

‘सेवेसाठी लागणार्‍या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ?’, याविषयी तिला सांगावे लागत नाही. सहसाधिका सेवा करतांना श्रियाने त्या साधिकेचे निरीक्षण करून त्याविषयी जाणून घेतले. एकदा एक साधिका रुग्णाईत असल्याने तिच्याऐवजी सेवेसाठी दुसरी साधिका आली. तेव्हा श्रियाने त्या साधिकेला ‘कुठे काय ठेवले आहे ?’, याविषयी अचूक सांगितले. ‘सेवा करतांना श्रियाची दृष्टी चौफेर असते’, हे लक्षात येते.

२. शिकण्याची वृत्ती

ती सेवा करतांना सहसाधकांकडून शिकते, तसेच तिची नवीन साधकांशी ओळख झाल्यावर किंवा त्यांच्यासह सेवा करतांनाही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करते. श्रिया त्या साधकांना कृतज्ञताभावाने सांगते, ‘‘श्री गुरूंनी मला तुमच्या समवेत सेवा करण्याची संधी दिली. मला तुमच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.’’ श्रियाने प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू यांच्याकडून शिकण्याची दृष्टी आत्मसात् केली आहे.

३. सेवाभाव

३ अ. तिच्याकडून सेवेला येण्याच्या वेळेत पालट झाल्यास ती त्या त्या वेळी कळवते.

३ आ. प्रत्येक सेवा आनंदाने करणे : ती वयाने लहान असूनही मोठ्या वयाच्या साधकांप्रमाणे सेवा करते. तिची सेवेची गतीही मोठ्या वयाच्या साधकांप्रमाणे आहे. अन्य लहान मुलांप्रमाणे एखादी सेवा आवडते; म्हणून मनापासून करणे अथवा आवडत नसल्यास न करणे, असे ती करत नाही. तिला सांगितलेली प्रत्येक सेवा ती आनंदाने करते.

३ इ. परिपूर्ण सेवा करणे : ती प्रत्येक सेवा विचारून करते. तिला एखादी सेवा एकदा सांगितली की, त्याविषयी पुन्हा सांगावे लागत नाही. ती सेवेतील सर्व बारकावे आत्मसात् करून परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करते.

३ ई. भावपूर्ण सेवा करणे : सेवा करतांना तिचे भावविश्व निराळेच असते. ती सेवा करतांना वस्तूंशी बोलते. ती सेवेत उपयोगी असणार्‍या वस्तूंना सांगते, ‘देवाने आपल्याला सेवेची संधी दिली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया.’ ती सहसाधकांनाही भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्याची आठवण करून देते.

४. तत्त्वनिष्ठ

श्रिया स्वत:च्या साधनेविषयी जेवढी सतर्क आणि अंतर्मुख असते, तेवढीच ती इतरांच्या साधनेविषयीही सतर्क असते. ती तिच्या वडिलांना (श्री. अनिरुद्ध यांना, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) त्यांच्या चुका सांगून त्यांना साधनेत साहाय्य करते.

५. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ श्रियाकडून कधी कधी विविध सूक्ष्मातील प्रयोग करून घेतात. त्या वेळी श्रियाची उत्तरे अवाक् करणारी असतात.

६. सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्या प्रती भाव

श्रियाने ‘वाढदिवसानिमित्त काय ध्येय ठेवायचे ?’, हे स्वत: न ठरवता तिने याविषयी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पू. वामन यांना विचारले. पू. वामन यांनी तिला सांगितले, ‘‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे’ या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न कर.’’ श्रियाने त्यातून ‘मला सर्वत्र श्री गुरूंनाच पहायचे आहे,’ असा भावार्थ स्वत:हूनच लक्षात घेऊन तसे ध्येय ठेवले.

७. आध्यात्मिक स्तरावर वागणे

श्रियाच्या वागण्या-बोलण्यात विलक्षण प्रगल्भता आहे. श्रिया विविध माध्यमांतून अखंड साधनारत रहाते. तिचे बोलणे आणि प्रश्न विचारणे, आध्यात्मिक स्तरावरील असते.

८. श्रियाने अत्यल्प कालावधीत स्वतःतील गुणांची वृद्धी करणे

श्रियामधील गुण पाहिल्यावर आश्चर्याने थक्कच व्हायला होते. तिच्यातील हे गुण दैवी असल्याचे लक्षात येते. तिच्यामध्ये काही दैवी गुण उपजतच असले, तरी ते वृद्धींगत करण्यासाठी ती सतत अंतर्मुख राहून प्रयत्न करते. साधकाने अनेक वर्षे साधना केल्यानंतर त्याच्यात जे गुण विकसित होतात, ते गुण श्रियाने अत्यल्प कालावधीत आत्मसात् केले आहेत. तिची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे होत आहे. तिच्यातील या दैवी गुणसंचयामुळे तिची पुढील प्रगतीही निश्चितच गतीने होईल.

‘दैवी बालिका कु. श्रिया हिच्यामधील या दैवी आणि समष्टी गुणवैशिष्ट्यांमधून प्रेरणा घेऊन सर्वत्रच्या साधकांचे व्यष्टी-समष्टी साधनेचे प्रयत्न वृद्धींगत व्हावेत,’ अशी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१९.४.२०२३)