‘माझ्या स्तनाच्या कर्करोगाचे (‘ब्रेस्ट कॅन्सर’चे) निदान होऊन माझे शस्त्रकर्म झाल्यावर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. स्तनाच्या कर्करोगाचे निदान होऊन शस्त्रकर्म करण्याचे निश्चित होणे
२३.४.२०२३ या दिवशी मी आणि माझी मुलगी आधुनिक वैद्या (सौ.) अमृता देशमाने माझ्या प्रकृतीच्या तपासणीसाठी आधुनिक वैद्य शेखर साळकर यांच्या घरी गेलो होतो. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘स्तनाचा कर्करोगच आहे’, असे निदान केले. ते म्हणाले, ‘‘उद्या रुग्णालयात येऊन सर्व चाचण्या करून घ्या. तुम्ही उद्याच रात्री रुग्णालयात भरती व्हा, म्हणजे आपण २५.४.२०२३ या दिवशी सकाळी ६ वाजता तुमचे शस्त्रकर्म करूया.’’
२. ‘माझ्या शरिराचे सर्व दायित्व ईश्वराकडेच आहे’, याची जाणीव होऊन कोणतीही काळजी न वाटता कृतज्ञताभावात रहाता येणे
त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी आणि माझे शरीर ईश्वरनिर्मित आहे आणि त्याचे दायित्वही त्याच्याकडेच आहे. तेव्हा तो बघेल, माझे काय करायचे ते ! प्रत्येक प्रसंगाला काहीतरी कार्यकारणभाव असतो.’
माझ्या मनात ‘ना विचार, ना चिंता !’ मी केवळ ईश्वराचे अस्तित्व आणि ईश्वराचे सार्वभौमत्व !’, अनुभवत होते. स्वतःची भावस्थिती जाणून घेतांना केवळ कृतज्ञताभावाविना माझ्या मनात काहीच विचार नव्हता. त्या वेळी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते’, हे वाक्य पुनःपुन्हा मुखात येत होते.
३. सद्गुरु अनुराधा वाडेकरलिखित भक्तीगीताचे स्मरण होणे
सद्गुरु अनुराधा वाडेकरलिखित भक्तीगीताच्या पुढील पंक्तींचे मला स्मरण होऊ लागले.
‘माझा श्वास प्रभूचा वास ।
बाकी सर्व भ्रम आणि भास ।। १ ।।
सर्वकाही तुझेच असावे ।
तुझ्याविना हे जीवनच नसावे ।। २ ।।
४. आश्रमातील आधुनिक वैद्यांनी धीर देणे
आधुनिक वैद्य साळकरांच्या घरून बाहेर पडल्यावर सौ. अमृताने आधुनिक वैद्य पांडुरंग मराठेकाका, तसेच आधुनिक वैद्या (सौ.) आशा ठक्कर यांना भ्रमणभाष करून कळवले. तेव्हा त्यांनी सौ. अमृताला धीर दिला. आधुनिक वैद्या आशा ठक्कर यांनी मला सांगितले, ‘‘काकू, घाबरू नका. काळजी वाटत असेल, तर तुम्ही स्वयंसूचना घेऊ शकता.’’
५. शस्त्रकर्म करतांना आणि नंतरही कोणत्याही प्रकारचा त्रास न होता गुरुकृपा अनुभवता येणे
२४.४.२०२३ या दिवशी मणिपाल रुग्णालयात सकाळी ९ ते १२ पर्यंत माझ्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या. मी घरी आणलेल्या सर्व सेवा पूर्ण करून त्याच दिवशी सायंकाळी आश्रमात पोचवल्या आणि रात्री मी रुग्णालयात भरती झाले. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता मला शस्त्रकर्म कक्षात घेतले. सर्व चाचण्या आणि शस्त्रकर्म करतांना अन् नंतरही मला काहीच वेदना जाणवत नव्हत्या. मी अखंड गुरुकृपा अनुभवली. ती पुष्कळ आनंददायी असून शब्दात सांगणे कठीण आहे.
६. सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांनी दिलेले नामजपादी उपाय केल्यावर मन स्थिर होणे
रुग्णालयात असतांना सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ यांनी मला नामजपादी उपाय दिले होते. ते उपाय चालू असतांना मला पुष्कळ शांत आणि स्थिर वाटत होते.
७. कुटुंबियांनी प्रेमभावाने सेवा करणे
शस्त्रकर्मापूर्वी आणि नंतरही आधुनिक वैद्य राकेश देशमाने (जावई), सौ. अमृता आणि त्यांचे स्नेही, तसेच दुसरी मुलगी सौ. अश्विनी सावंत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), तसेच अन्य आधुनिक वैद्य यांनी अनेक उदाहरणे सांगून मला आश्वस्त केले आणि मला आधार दिला. त्या सर्वांनी अत्यंत प्रेमभावाने माझी केलेली सेवा, हे कृतज्ञतेचे भावक्षण आहेत.
८. शस्त्रकर्मानंतर घरी आल्यावर दुपारी विश्रांती घेत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणकमलांचे तीर्थ प्राशन करत असल्याचे दिसणे
शस्त्रकर्मानंतर मी घरी आल्यानंतर २ दिवसांनी दुपारी विश्रांती घेत असतांना मला पुढील दृश्य दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराजांचे चरणकमल दिसले. त्यांवर तुलसीदल होते. त्या चरणकमलांचे तीर्थ सौ. अश्विनी (माझी मुलगी) मला पाजत आहे. अत्यंत थंड असे चरणकमलांचे तीर्थ प्राशन करतांनाचा तो अवर्णनीय आणि अद्वितीय असा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवतांना मी धन्य धन्य झाले.’
९. शस्त्रकर्मानंतर अहवाल येण्यास थोडा विलंब झाल्याने काळजी वाटणे; पण हातावर आलेला दैवी कण पाहिल्यावर ‘तो धीर देत आहे’, असे वाटून चिंतामुक्त होता येणे
शस्त्रकर्मानंतर काही दिवसांनी आलेल्या सलग सुट्यांमुळे कर्करोगाचे अहवाल येण्यास अपेक्षेपेक्षा ४ – ५ दिवस विलंब झाला. तेव्हा क्षणभर माझ्या मनात ‘विलंब का झाला ?’, असा चिंतायुक्त विचार आला. त्याच वेळी माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर १ सोनेरी दैवीकण दिसला. ‘मी आहे, तू काळजी करू नकोस !’, असे तो सोनेरी दैवीकण माझ्याकडे पाहून म्हणत आहे’, असे मला वाटले. त्यामुळे मला आलेल्या चिंतायुक्त विचारांची खंत वाटली.
१०. गुरुकृपेने ‘केमोथेरेपी’ करावी न लागता केवळ ‘रेडिएशन ट्रीटमेंट’ करावी लागणे
चांगले ‘प्रॉग्नोसिस’ असलेला ‘हिस्टोपॅथॉलॉजी’चा अहवाल आला. ‘केमोथेरेपी’ लागणार कि नाही’, हे ठरवण्यासाठी ‘Canassist’चा अहवालही धोका कमी असल्याचा (‘Low risk’) आला. ‘ट्यूमर’चा आकार मोठा असल्याने आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘१५ दिवस ‘लोकल रेडिएशन ट्रीटमेंट’ घेऊया.’’ कर्करोगाचे अहवाल पाहून आधुनिक वैद्या (सौ.) अमृता म्हणाली, ‘‘असे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’’
११. गुरुकृपेने ब्रह्मोत्सवात ६ – ७ घंटे आनंदाने बसता येणे
गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशीच माझी ‘ड्रेन सिस्टीम’ (शस्त्रक्रिया केल्यानंतर तेथील जमलेले रक्त, पू आणि इतर स्राव बाहेर निघण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था) काढली होती. ‘मी गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात बसू शकेन का ?’, असे सर्वांना वाटत होते. प्रत्यक्षात ब्रह्मोत्सवात मी ६ – ७ घंटे आनंदाने बसू शकले.
१२. ब्रह्मोत्सवानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष येणे, त्यांच्या शब्दातील चैतन्याने वेगळीच भावस्थिती अनुभवता येणे
गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव झाल्यावर मला एके दिवशी दुपारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा भ्रमणभाष आला. त्या मला म्हणाल्या, ‘‘काकू, कशा आहात ?’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘मी छान आहे.’’ त्या बोलत होत्या आणि मी त्यांचे बोलणे ऐकत होते. त्यांच्या शब्दातील चैतन्य आणि बोलणे ऐकतांना मला झालेल्या अत्युच्च आनंदामुळे मी वेगळ्याच भावस्थितीत गेले. ते आनंदाचे भावक्षण माझ्या अंतरी कोरून राहिले. त्या भावस्थितीमुळे मला त्यांच्या संवादातील एकही शब्द आठवत नाही.
१३. कृतज्ञता
गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे अनुभवलेली निर्विचार स्थिती, निश्चिंतता, अखंड गुरुकृपा आणि मला आलेली अत्युच्च अनुभूती हा माझ्या भावविश्वातील अनमोल अन् अद्वितीय असा खजिना आहे. गुरुदेव, आपल्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करणे, हे शब्दांच्या पलीकडचे आहे. आपल्या अपार प्रीतीचे वर्णन शब्दातीत आहे. गुरुदेव, आपली सर्वज्ञता, सर्वव्यापकता आणि सर्वशक्तीमानता प्रत्यक्ष अनुभवणे, म्हणजे केवळ आनंद आणि शांती आहे. गुरुदेव, मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. अनुराधा हरिश्चंद्र निकम (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (६.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |