कर्नाटक उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीच्या वेळी चालू झाला अश्‍लील व्हिडिओ !

  • ‘हॅकर्स’कडून सायबर आक्रमण !

  • ऑनलाईन सुनावणी स्थगित

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयात एका खटल्याच्या ऑनलाईन सुनावणीच्या वेळी अचानक एक अश्‍लील व्हिडीओ चालू झाला. यामुळे न्यायालयात गोंधळ उडाला. न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. काही हॅकर्सनी (संगणकीय प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करून ती कह्यात घेणार्‍यांनी) ‘झूम’ अ‍ॅपच्या माध्यमातून चालू असलेल्या या ऑनलाईन खटल्यामध्ये हा व्हिडिओ चालवला होता. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर न्यायालयाच्या प्रशासनाने सायबर सुरक्षेचा विचार करून बेंगळुरू, धारवाड आणि कलबुर्गी खंडपिठांतील ऑनलाईन सुविधा काही वेळासाठी बंद ठेवल्या आहेत. ४ डिसेंबरला दुपारी न्यायालयाच्या ६ कक्षांमध्येही हा व्हिडिओ दिसू लागला होता. दुसर्‍या दिवशीही हॅकर्सकडून असाच व्हिडिओ चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे न्यायालयाने ऑनलाईन सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला.