प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांची चित्रे काढतांना साधकाला आलेल्या अनुभूती

प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांची चित्रे काढतांना श्री. प्रसाद हळदणकर यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

श्री प्रसाद हळदणकर यांनी प.पू. भक्तराज महाराज यांचे रेखाटलेले चित्र 

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली एका साधकाने काढलेली गुरुदेवांची चित्रे पाहून अनेक वर्षांपासूनच्या गुरुदेवांचे चित्र काढण्याच्या इच्छेला बळ मिळणे

‘१२.७.२०२० या दिवशी श्री. विजय जाधव (जळगाव) यांनी काढलेली गुरुदेवांची चित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ती पाहिल्यावर माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या गुरुदेवांचे चित्र काढण्याच्या इच्छेला बळ मिळाले. ‘देवाशी काही प्रमाणात अनुसंधान होईल’, या भावाने मी प्रयत्न करण्याचे ठरवले. चौकट आखून चित्र काढण्याचा विचार माझ्या मनात आला. गुरुदेव आतून बोलल्याचे जाणवले, ‘प्रत्येक चौकट अचूक आली, तर चित्रही अचूक येणार.’ मग मी तसा प्रयत्न चालू केला.

श्री प्रसाद हळदणकर यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रेखाटलेले चित्र 

२. चित्रातील प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर आतून कृतज्ञता व्यक्त होणे आणि गुरुदेवांचे चित्र काढल्यावर ‘ते प.पू. भक्तराज महाराज यांच्या चित्राविना अपूर्ण आहे’, असे वाटणे

चित्रातील प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर अधूनमधून माझ्याकडून चित्राला हात जोडून नमस्कार व्हायचा आणि आतून कृतज्ञता व्यक्त होत होती. ते चित्र पूर्ण होण्यास तीन दिवस लागले. ‘गुरुदेवांचे चित्र (यात गळ्यावर ‘ॐ’ आहे.) काढल्यावर ते प.पू. भक्तराज महाराज यांच्या चित्राविना अपूर्ण आहे’, असे मला वाटू लागले.

श्री प्रसाद हळदणकर

३. प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव यांची चित्रे काढतांना वेळेचे भान न रहाणे

मी प.पू. बाबांचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ते काढण्यास पुष्कळ कठीण जात होते. त्यामुळे सतत आतून आर्ततेने प्रार्थना होत होती. ते चित्र पूर्ण होण्यास दोन दिवस लागले. ही चित्रे काढत असतांना एकदा रात्रीचे अडीच वाजले आणि एकदा पहाटेचे साडेचार वाजले. चित्र काढतांना मला वेळेचे भान नसायचे.

४. चित्र काढतांना ‘त्यात तत्त्वाची जागृती भगवंत करत आहे’, याची जाणीव असणे आणि चित्रे काढण्याचा कोणताही सराव किंवा अनुभव नसतांना केवळ देवाच्या कृपेने चित्रे काढता येणे

प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र काढतांना मी केवळ टोपीचा आकार काढला होता. ते पाहून माझी पत्नी (सौ. प्रचीती हळदणकर (पूर्वाश्रमीची कु. वर्षा जाधव)) म्हणाली, ‘‘प.पू. बाबांचे अस्तित्व त्यामध्ये जाणवते.’’ यावरून ‘चित्र मी काढत असलो, तरी त्यात तत्त्वाची जागृती भगवंत करत आहे’, याची जाणीव सतत असायची. अशी चित्रे काढण्याचा मला कोणताही सराव किंवा अनुभव नाही. केवळ देवाच्या कृपेने मला ही चित्रे काढता आली. ही चित्रे पूर्ण झाल्यावर त्याकडे पाहून वाटते, ‘मी ही चित्रे काढलेलीच नाहीत’ आणि माझा कृतज्ञताभाव जागृत होतो.’

– श्री प्रसाद हळदणकर, बेळगाव.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक