अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सौ. मेघा वट्टमवार यांनी सेवेसाठी दुचाकी शिकणे आणि सनातन संस्थेच्या कार्याबद्दल समाजातून त्यांना मिळालेला प्रतिसाद !

सौ. मेघा वट्टमवार

१. गुरुकृपेने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करण्यासाठी दुचाकी शिकता येणे

१ अ. सेवा अल्प काळ करत असल्याने साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करण्यास विलंब होणे : ‘माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा होती. मला २४ अंकांचे वितरण करावे लागत असे. एवढे अंक देण्यासाठी पुष्कळ वेळ लागत असे. मी प्रतिदिन २ घंटे सेवा करत असल्यामुळे साप्ताहिक देण्यास अधिक दिवस लागत असत. मला वाटत असे, ‘रात्री जास्त विलंब व्हायला नको.’

१ आ. सेवा वेळेत होण्यासाठी दुचाकी शिकणे : सेवा वेळेत होण्यासाठी मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) आर्ततेने प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, तुम्हीच मला दुचाकी शिकवा. मला काहीच येत नाही. तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करून घ्या.’ त्यानंतर मला हळूहळू दुचाकी येऊ लागली. भावजागृतीचे प्रयोग करतच मी दुचाकी चालवत होते.

१ इ. सतत प्रार्थना आणि भावजागृतीचा प्रयोग करत दुचाकी चालवणे : दुचाकी चालवायला प्रारंभ करतांना मी वाहनदेवता आणि पृथ्वी, आप, तेज, वायु अन् आकाश या पंचतत्त्वांना प्रार्थना करायचे. दुचाकी चालवतांना ‘हा गुरुदेवांचा रथ आहे. गुरुदेव गाडीवर बसले आहेत आणि मी त्यांच्या पाठीमागे बसले आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करतच सेवेला जात असे.

२. सनातन संस्थेच्या कार्याविषयी समाजातून मिळालेला प्रतिसाद

अ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतांना मी एका वाचकाच्या घरी साप्ताहिक देण्यासाठी गेले. तेथे त्यांचा मुलगा आणि सूनबाई होत्या. ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला हा पेपर देण्यासाठी किती वेतन (पेमेंट) देतात.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही सर्व साधक विनामूल्य सेवा करतो.’’ मी त्यांना सेवा, त्याग आणि नामस्मरण या गोष्टींचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी अर्पण दिले.

आ. समाजात सेवेला गेल्यानंतर पूर्वी आम्हाला एवढा प्रतिसाद मिळत नव्हता; पण आता तो मिळत आहे. सनातनचे साधक म्हणून आमचा ते आदर करतात.

इ. काही वेळा गुरुपौर्णिमेच्या सेवा चालू असतांना आम्ही कुणाला संपर्क केला, तर ‘‘आता आमच्याजवळ पैसे नाहीत, नंतर या’’, असे सांगितले जाते. समजा आमच्याकडून त्यांच्याकडे पुन्हा जाणे झाले नाही, तर ते स्वतः भ्रमणभाष करून सांगतात, ‘आमचे अर्पण घेऊन जा.’

ई. आम्ही समाजात आणि ओळखीच्या ठिकाणी गेलो, तर ते म्हणतात, ‘‘सनातनच्या साधकांचे पाय घराला लागले, हे आमचे भाग्य आहे.’’

– सौ. मेघा सुनील वट्टमवार (वय ५७ वर्षे), अंबाजोगाई, बीड. (११.६.२०२३)

‘सर्वत्रच्या साधकांनी वाहन चालवण्यास शिकावे, याविषयी परत्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितले होते. सौ. मेघा वट्टमवार यांनी सेवेसाठी दुचाकी शिकून सेवा परिपूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श घेऊन साधकांनीही सेवेची फलनिष्पत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. – संकलक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक